जेलमधून आयआयटीची परीक्षा पार करणारा विद्यार्थी !

लिस्टिकल
जेलमधून आयआयटीची परीक्षा पार  करणारा विद्यार्थी !

आजवर तुम्ही गरीबीतून मार्ग काढत, अतिशय अडीअडचणीच्या परिस्थितीवर मात करत मोठी परीक्षा पास झालेले विद्यार्थी खूप बघितले असतील. हे विद्यार्थी खरोखर समाजासाठी आदर्श असतात. पण कधी जेलमध्ये असणारा मुलगा मोठी परीक्षा पास झाला असे ऐकले आहे का? सूरज कुमार हा २३ वर्ष असलेला मुलगा थेट जेलमधून आयआयटीची परीक्षेत पास झाला आहे. 

बिहार येथील वार्सालीगंजजवळ मोसमा नावाचे गाव आहे. सूरज कुमार हा विद्यार्थी कोटा येथे त्याची आयआयटीची तयारी करत असे. पण गेल्यावर्षी मार्च महिन्यात हा भाऊ घरी आला असताना, तिथे दोन गटांमध्ये मोठे भांडण झाले. या भांडणात संजय यादव नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला. संजयच्या वडीलांनी जी चार नावे सांगितली त्यात सूरज पण होता.

 

गेल्या एप्रिलपासून सूरज नवाडा विभागीय कारागृहात कैद आहे. तिथे काही दिवस टेन्शनमध्ये गेल्यावर मात्र त्याने परत अभ्यास करण्याचे ठरवले. यासाठी त्याने तुरुंगअधिकाऱ्यांची मदत घेतली. अभ्यास सुरू केला आणि त्याचा आत्मविश्वास वाढला. जेलमध्ये असेही इतर कामे नसल्याने पूर्ण वेळ तो अभ्यासाला देऊ लागला. 

जेलमध्ये असलेला हा मुलगा आयुष्यातुन संपला असेच त्याच्या गावात समज झाला होता. पण जेव्हा आयआयटीचा निकाल लागला तेव्हा मात्र पठ्ठ्याने फुल हवा केली. देशात ५४ वा क्रमांक मिळवत त्याने स्वतःला सिद्ध केले आहे. जेलमध्ये असल्याने त्याला ही आनंदाची बातमी कळायला एक आठवडा लागला.

सूरजने आयआयटीकडून मास्टर्ससाठी घेतली जाणारी जॉईंट ऍडमिशन टेस्ट फॉर मास्टर्स ही परीक्षा पास केली आहे. ही परीक्षा पास झालेला मुलगा आयआयटीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनचे शिक्षण घेण्यासाठी भरती होत असतो. वास्तविक त्या जेलमध्ये क्षमतेपक्षा डब्बल कैदी आहेत. 

इतक्या गर्दीत आणि टेन्शन असून देखील सूरजने मिळवलेले यश कौतुकास्पद आहे. आयुष्यात इतक्या मोठ्या अडचणी येऊन पण हार न मानता प्रामाणिक प्रयत्न केले तर मिळालेले यश हे सर्व अडचणी संपवून जाते हेच यातून सिद्ध होते.

उदय पाटील