स्विस ओपन २०२२ : पीव्ही सिंधूने रचला इतिहास! पहिल्यांदाच स्पर्धेच्या जेतेपदावर कोरले नाव

स्विस ओपन २०२२ : पीव्ही सिंधूने रचला इतिहास! पहिल्यांदाच स्पर्धेच्या जेतेपदावर कोरले नाव

भारताची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने स्विस ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे. सिंधूने अंतिम फेरीत थायलंडच्या बुसानन ओंगबामरांगफानचा २१-१६, २१-८ असा पराभव करून पहिल्यांदाच या स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. मात्र पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत भारताच्या एचएस प्रणॉयला इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्टीकडून पराभव पत्करावा लागला.

गतवर्षी झालेल्या स्पर्धेत सिंधूला अंतिम फेरीत स्पेनच्या कॅरोलिना मरीनकडून पराभव पत्करावा लागला होता. अशा स्थितीत जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेली सिंधू यावेळी पहिली स्विस ओपन जिंकण्यासाठी कोर्टवर आली होती. पहिल्या सेटमध्ये सिंधू आणि बुसानन यांच्यात चांगली लढत झाली मात्र हा सेट सिंधूच्या नावावर राहिला. दुसऱ्या सेटमध्ये सिंधूला फारशी अडचण आली नाही. ४९ मिनिटे चाललेल्या या सामन्यात सिंधूने आपले वर्चस्व दाखवले. हे दोन्ही खेळाडू १७ व्या वेळी आमने सामने आले होते. दरम्यान १६ वेळेस पीव्ही सिंधूने बाजी मारली आहे.

या वर्षी सय्यद मोदी सुपर ३०० चे विजेतेपद पटकावणाऱ्या सिंधूचे हे या हंगामातील दुसरे विजेतेपद आहे. याच ठिकाणी सिंधूने २०१९ च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपचे सुवर्णपदक जिंकले होते आणि आता स्विस ओपनच्या विजेतेपदासह हे ठिकाण सिंधूसाठी आणखीनच खास बनले आहे.