दरवाजा म्हटलं की काही वर्षांपूर्वी सीआयडीच्या एसीपी प्रद्युमन यांचा 'दया, दरवाजा तोड' हा आदेशच आठवायचा.आता मात्र दरवाजा म्हटलं की बर्याच वेळा 'सेक्रेड गेम्स'च्या गणेश गायतोंडेच्या 'सिक्रेट बंकर'चा दरवाजाच आठवतो. हां, तोच दरवाजा ज्याची चावी जोजो मागत असते,तोच तो ! एखाद्या बॅंकेच्या स्ट्राँगरुमच्या दरवाज्यासारखा दिसणारा तो दरवाजा आहे.काही दिवसातच होणार्या अणुविस्फोटापासून वाचण्यासाठी गणेश गायतोंडेने तो बसवलेला दाखवला आहे. पण तो दरवाजा निव्वळ 'सिनेमॅटीक' आहे. आज आपण बघूया अणुविषयक तंत्रज्ञान विकसित करणार्या प्रयोगशाळांचे काही दरवाजे !
अणुतंत्रज्ञानाच्या प्रयोगशाळांचे दरवाजे ज्यांच्यामागे 'सिर्फ त्रिवेदी बचेगा '! !


१९७९ सालचा हा फोटो आहे लॉरेन्स लिव्हमोर नॅशनल लॅबॉरेटरीचा ! या प्रयोगशाळेत fusion neutrons म्हणजे फ्युजन तंत्रात वापरण्यात येणार्या न्यूट्रॉनचा वापर केला जातो.पृथ्वीवर आढळणार्या कोणत्या धातूंचा वापर करून भविष्यातील सुरक्षित फ्युजन पॉवर प्लँट बनवता येईल याचा अभ्यास या प्रयोगशाळेत केला जातो. आठ फूट जाड -बारा फूट रुदीच्या सिमेंट काँक्रीट आणि पोलाद वापरून बनवलेल्या दरवाज्याचे वजन ९७००० पाउंड म्हणजे ३८ टनाच्या आसपास आहे. पण आश्चर्याची गोष्ट अशी की इतका महाकाय दरवाज्याच्या बिजागर्यात अशी बॉलबेअरींग वापरण्यात आली आहेत की एक सर्वसाधारण माणूसही हा दरवाजा उघडू किंवा बंद करू शकतो

आता हा दुसरा दरवाजा बघा. अमेरिकन हवाई दलाच्या चेनेन माउंटन काँप्लेक्सच्या न्युक्लीअर बंकरचा हा दरवाजा आहे.इथे काम करणारे कर्मचारी अशा दोन दारांच्या आड त्यांचे काम करत असतात.जमिनीखाली २००० फूटावर कातळाच्याखाली त्यांची कार्यालये आणि प्रयोगशाळा आहेत.त्यांना लागणारी हवा बाहेरून पुरवली जाते.हे दरवाजे ३० मेगाटन स्फोटकांचा मारा सहन करू शकतात.३० मेगाटन म्हणजे नागासाकी शहरावर टाकलेल्या अणुबाँबसारखे १४२९ बाँब !

पण या दरवाज्यांचेही 'बाप' दरवाजे ब्रिटनच्या JET (Joint European Torus) प्रयोगशाळेचे आहेत.एकूण ३दरवाज्यां पैकी दोन प्रत्येकी ११०० टनाचे आहेत तर तिसर्या मजल्यावरचा एक दरवाजा ९०० टनाचा आहे.
एक मात्र खरं की दिवसागणिक हळूहळू मानवी मनाचे दरवाजे बंद होता असताना असे दरवाजे उघडले जात आहेत