ड्रग तस्करी आणि ड्रग्ज वॉर जगजाहीर आहे. पाब्लो इस्कोबार आणि नार्कोस आठवत असेलच तुम्हांला. मेक्सिकोतही ड्रग्जचा व्यवसाय करणाऱ्या अनेक टोळ्या आहेत ज्यांना हे कार्टेल संबोधतात. ड्रग्जच्या किंमतीपासून त्याच्या वितरणापर्यंतच्या सर्व गोष्टींवर या कार्टेल्सचेच नियंत्रण असते. इथल्या कार्टेल्सच्या ड्रग वॉरने आधीच लाखो लोकांचे रक्त सांडले आहे. ड्रग्ज व्यवसायातील मोठा डॉन 'एल चापो'ला अटक केल्यानंतर मेक्सिकोला लागलेली ही ड्रग तस्करीची कीड संपेल अशी अशा होती. पण इथे नेमके याच्या उलटेच होत आहे. मेक्सिकोतील ड्रग कार्टेल्सनी इथले पोलीस आणि लष्कर दोन्हींसमोर एक मोठे आव्हान उभे केले आहे.
या कार्टेल्सनी आपल्या गुप्त संदेशाची देवाणघेवाण करण्यासाठी स्वतःची स्वतंत्र रेडिओ यंत्रणा उभारली आहे. यासाठी हे तस्कर तंत्रज्ञानात पारंगत असणाऱ्या इंजिनियर्सचे अपहरण करतात आणि त्यांच्याकडून आपल्याला हवी त्या पद्धतीची संदेशवहन प्रणाली तयार करून घेतात. विशेष म्हणजे या कार्टेल्सनी आजपर्यंत जितक्या इंजिनियर्सचे अपहरण केले आहे त्यातील एकही इंजिनियर्स त्यांच्या तावडीतून सुटून सहीसलामत परत आलेला नाही. त्यांचे पुढे काय होते हेही कुणाला कळत नाही.






