भारतात आयपीएल हिट झाले आणि जगभर अशा स्पर्धा आपल्याकडे पण भरवल्या जाव्या म्हणून चढाओढ लागली. पण आयपीएल एवढी प्रसिध्दी काय या स्पर्धांना मिळाली नाही. गेल्या वर्षी इंग्लिश क्रिकेट बोर्डाने मात्र क्रिकेटचा पॅटर्न बदलणारी स्पर्धा आयोजित करण्याचा घाट घातला होता पण तो काय कोरोनाने यशस्वी होऊ दिला नाही.
द हंड्रेड म्हणून स्पर्धा इंग्लंडमध्ये भरवली जाणार होती. चालढकल करत शेवटी ही स्पर्धा या महिन्यात २१ जुलै पासून सुरु होत आहे. ही स्पर्धा क्रिकेटची असली तरी आजवर या प्रकारची स्पर्धा कधीही झालेली नाही. द हंड्रेड या नावातच स्पर्धेचे गुपित आहे. फक्त १०० बॉल्सचा सामना यात असेल. त्यातही ६ बॉल्सची ओव्हर न होता १० बॉल्सची ओव्हर असेल. म्हणजेच १० ओव्हर्समध्ये सामना खलास!!!






