बाद की नाबाद? अंपायरने चुकीचा निर्णय दिल्यामुळे पेटला नवा वाद; नेटकऱ्यांनी दिल्या संतप्त प्रतिक्रिया

बाद की नाबाद? अंपायरने चुकीचा निर्णय दिल्यामुळे पेटला नवा वाद; नेटकऱ्यांनी दिल्या संतप्त प्रतिक्रिया


सध्या सर्वत्र आयपीएल २०२२ (Ipl 2022) स्पर्धेची चर्चा सुरू आहे. या स्पर्धेत चौकार आणि षटकारांसह चुकीची अंपायरींग देखील चर्चेचा विषय ठरतेय. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात झालेल्या सामन्यात नो चेंडूवरुन मोठा वाद देखील झाला होता. परंतु तुम्हाला जर असं वाटत असेल की, चुकीची अंपायरींग केवळ आयपीएल स्पर्धेत होतेय, तर हा तुमचा गैरसमज आहे. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या काउंटी चॅम्पियनशिप स्पर्धेत असा काही प्रकार घडला आहे, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

काउंटी चॅम्पियनशिप स्पर्धेत फलंदाज जॉर्डन कॉक्सला अंपायरद्वारे ज्या प्रकारे बाद घोषित करण्यात आले आहे, ते पाहून सर्वांनाच आश्चर्य झाले आहे. तर झाले असे की, रविवारी( २४ एप्रिल) काउंटी चॅम्पियनशिप डीव्हीसन वनचा सामना केंट आणि हॅम्पशायर या दोन्ही संघांमध्ये सुरू होता. या सामन्यात २१ वर्षीय फलंदाज जॉर्डन कॉक्सला विवादास्पद पद्धतीने बाद घोषित करण्यात आले. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी आपल्या प्रतिक्रीया द्यायला सुरुवात केली आहे.

तर झाले असे की, जॉर्डन कॉक्स फलंदाजी करत असताना, डाव्या हाताच्या फिरकी गोलंदाजाने ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकला. हा चेंडू फलंदाजाने पॅडच्या साहाय्याने थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु चेंडू पॅडला लागून शॉट लेगला क्षेत्ररक्षण करत असलेल्या खेळाडूच्या हातात गेला. अपील केल्यानंतर अंपायरने क्षणही न दवडता फलंदाजाला बाद घोषित केले. हा निर्णय पाहून फलंदाज देखील आश्चर्यचकित झाला होता. तसेच हा व्हिडिओ बेन स्टोक्सने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर करत, "काय... कसं काय..नाही.." असे लिहिले आहे.

नेटकऱ्यांनी दिल्या अशा प्रतिक्रीया

हा व्हिडिओ व्हायरल होताच चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त करायला सुरुवात केली आहे. एका युजरने ट्विट करत लिहिले की, "मी हा व्हिडिओ, २० वेळेस पाहिला तरीदेखील मला जाणवले नाही की, अंपायरने फलंदाजाला बाद घोषित का केले."

You're the umpire. Are you giving this out? #LVCountyChamp pic.twitter.com/ec4fwFJOAS

— LV= Insurance County Championship (@CountyChamp) April 24, 2022

तर दुसऱ्या एका  युजरने ट्विट करत लिहिले की, "स्टिव्ह बकर निवृत्तीतून बाहेर आले का??.." तसेच आणखी एका युजरने ट्विट करत लिहिले की, "हा एक विनोद असल्यासारखे वाटत आहे..."