क्रिकेटमध्ये फलंदाज ज्या बॅटच्या साहाय्याने धावा करतात, ती बॅट लाकडाचा वापर करून बनवण्यात आलेली असते. या बॅटची देखील लांबी,रुंदी आणि वजन ठरलेले असते. नियमात बसत असेल तर, ठीक. नाहीतर योग्य ती कारवाई देखील केली जाते. आम्ही तर तुम्हाला सांगितलं की, क्रिकेटमध्ये एक फलंदाज लाकडाची नव्हे तर थेट अल्युमिनियमची बॅट घेऊन मैदानात उतरला होता तर तुमचा विश्वास बसेल का? नाही ना? मात्र असाच काहीसा प्रकार आजच्याच दिवशी १९७९ मध्ये घडला होता. काय आहे नेमकं प्रकरण, चला जाणून घेऊया.
खेळपट्टीवर अल्युमिनियमची बॅट घेऊन येणारा दुसरा तिसरा कोणी नसून दिग्गज गोलंदाज डेनिस लिली होता. डेनिस लिली हा आपल्या आक्रमक गोलंदाजीसाठी ओळखला जायचा. मात्र यावेळी तो आपल्या गोलंदाजीमुळे नव्हे तर फलंदाजीमुळे चर्चेत आला होता. ज्यावेळी हे सर्व घडलं, त्यावेळी बॅट वापरण्याबाबत कुठलेही नियम बनवण्यात आले नव्हते. याचाच फायदा घेत, लिली थेट अल्युमिनियमची बॅट घेऊन मैदानात आला.
तर झाले असे की, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये १९७९ रोजी कसोटी सामना सुरू होता. सामन्याचा दुसरा दिवस अन् लिली फलंदाजी करण्यासाठी आला. सुरुवातीला काही विशेष वाटलं नाही. मात्र चेंडू बॅटला लागताच विशिष्ट प्रकारचा आवाज येऊ लागला. इंग्लडच्या कर्णधाराला ही बाब लक्षात येताच त्याने पंचांकडे तक्रार केली. तक्रार केली असता पंचांनी त्याला लाकडाच्या बॅटने खेळण्याचा सल्ला दिला. अल्युमिनियमची बॅट ही लाकडाच्या बॅटच्या तुलनेत वजनदार असते. तसेच या बॅटने खेळल्यामुळे चेंडू खराब होण्याची देखील भीती असते.
यापूर्वी देखील केला होता अल्युमिनियमच्या बॅटचा वापर..
डेनिस लिली अल्युमिनियमची बॅट घेऊन मैदानात येण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. इंग्लंड विरुध्द झालेल्या या सामन्याच्या १२ दिवसांपूर्वी त्याने वेस्ट इंडिज विरुध्द खेळताना देखील याच बॅटचा वापर केला होता. या सामन्यात देखील जेव्हा त्याने चेंडू मारण्यासाठी बॅट फिरवली त्यावेळी वेगळा आवाज आला होता. मात्र त्याला या सामन्यात मोठी खेळी करता आली नव्हती.
