नारी कॉन्ट्रॅक्टर हे भारतीय क्रिकेट इतिहासात गाजलेलं नाव आहे. ३१ कसोटी सामन्यांमध्ये त्यांनी भारतीय संघाचे नेतृत्व केले. ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध झालेल्या मालिकेत विजय तर इंग्लंड सारख्या बलाढ्य संघांविरुद्ध खेळताना लॉर्ड्सच्या मैदानावर केलेल्या ८१ धावांच्या खेळीमुळे ते नेहमीच चर्चेत राहिले. नारी कॉन्ट्रॅक्टर यांनी आपल्या कारकिर्दी दरम्यान अनेक महत्वपूर्ण खेळ्या केल्या. मात्र त्यांच्या उत्तम सुरुवातीला हवा तसा शेवट मिळाला नाही. दुर्वैवाने १९६२ चा वेस्ट इंडिज दौरा हा त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीतील शेवटचा दौरा ठरला.
या दौऱ्यावर असं काही घडलं होतं ज्यामुळे संपूर्ण क्रिकेट विश्व हादरून गेलं होतं. वेस्ट इंडिजच्या गोलंदाजाने त्यांना मृत्यूच्या दारात ढकललं होतं. मात्र नशिबाने तो पुन्हा परतले होते. त्यांना मृत्यूच्या दारात ढकलणारा गोलंदाज दुसरा तिसरा कोणी नसून चार्ली ग्रिफिथ होता. या घटनेनंतर नारी कॉन्ट्रॅक्टर वाचले परंतु त्यांची कारकीर्द वाचवण्यात ते अपयशी ठरले.
चार्ली ग्रिफिथने टाकलेला खतरनाक बाउन्सर चेंडू..
वेस्ट इंडिज संघातील दिग्गज गोलंदाज चार्ली ग्रिफिथ आज आपला ८४ वा वाढदिवस साजरा करत आहेत. १९६१-६२ रोजी भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी भारतीय कर्णधार नारी कॉन्ट्रॅक्टर यांना चार्ली ग्रिफिथ यांनी टाकलेल्या घातक बाउन्सर चेंडूची चव चाखावी लागली होती. चार्ली ग्रिफिथ यांनी टाकलेला चेंडू नारी कॉन्ट्रॅक्टर यांच्या डोक्याच्या मागच्या बाबाजूला जाऊन लागला होता. हा चेंडू इतका घातक होता की, चेंडू लागल्यानंतर नारी कॉन्ट्रॅक्टर यांच्यावर दोनदा शस्त्रक्रिया करावी लागली होती. मुख्य बाब म्हणजे भारतीय कर्णधाराला रक्ताची कमतरता भासली असता, वेस्ट इंडिज संघाचे कर्णधार फ्रॅन्क वोरेल यांनी रक्त दिले होते.
अथक प्रयत्न केल्यानंतर नारी कॉन्ट्रॅक्टर यांचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना यश आले. मात्र ते पुन्हा क्रिकेट खेळू शकले नाहीत. या चेंडू नंतर चार्ली ग्रिफीथचा सामना करायला फलंदाज घाबरत होते. त्याची गिनती सर्वात खतरनाक वेगवान गोलंदाजांमध्ये केली जाऊ लागली. मात्र अनेकांना ही बाब माहीत नसावी, चार्ली ग्रिफिथ हे एक उत्तम फिरकीपटू होते. त्यानंतर त्यांनीं वेगवान गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पुढे काय झालं, हे संपूर्ण क्रिकेट विश्वाने पाहिले आहे. चार्ली ग्रिफिथ हे जगातील सर्वात वेगवान गोलंदाजांपैकी एक आहेत.
