कसोटी क्रिकेटमध्ये सामन्याचे ३ निकाल लागू शकतात. एकतर एखादा संघ जिंकतो किंवा पराभूत होतो. जर सामन्याचा कुठलाही निकाल नाही लागला तर तो सामना ड्रॉ होतो. मात्र सामन्याचा निकाल लागण्याचा चौथा पर्याय देखील आहे. हा पर्याय म्हणजे सामना अनिर्णीत राहणे. आता तुम्ही म्हणाल, कसोटी क्रिकेटमध्ये सामना अनिर्णीत राहणं कसं शक्य आहे. कसोटी क्रिकेटमध्ये पहिला टाय सामना आजच्याच दिवशी पाहायला मिळाला होता. चला जाणून घेऊया या ऐतिहासिक सामन्याबद्दल अधिक.
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आजच्याच दिवशी क्रिकेट चाहत्यांना पहिला अनिर्णीत सामना पाहायला मिळाला होता. १४ डिसेंबर १९६० रोजी ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांमध्ये हा सामना पार पडला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाचा विजय जवळजवळ निश्चित होता. मात्र एकाच षटकात सामन्याचा निकाल बदलला. एका थ्रो मुळे ऑस्ट्रेलिया संघाचे विजय मिळवण्याचे स्वप्न भंगले होते.
असा झाला सामना टाय..
वेस्ट इंडिज संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ४५३ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलिया संघाने ५०५ धावांचा डोंगर उभारला होता. वेस्ट इंडिज संघ ज्यावेळी दुसऱ्या डावात फलंदाजीला आला त्यावेळी या संघाने २८४ धावा करत ऑस्ट्रेलिया संघाला विजय मिळवण्यासाठी २३३ धावांचे आव्हान दिले होते. या धावांचा पाठलाग करताना ६९ व्या षटकांपर्यंत ऑस्ट्रेलिया संघाची धावसंख्या २२७ धावा इतकी होती. जिंकण्यासाठी केवळ ६ धावांची आवश्यकता होती. मात्र एकाच षटकात खूप काही घडलं . या षटकात झेल सुटले, दोन फलंदाज धावबाद झाले. मात्र शेवटचा फलंदाज धावबाद झाल्याने हा सामना अनिर्णीत राहिला.
एक झेल आणि धावबाद केल्यामुळे ऑस्ट्रेलियाचे ९ फलंदाज माघारी परतले होते. ऑस्ट्रेलिया संघाने स्कोअरबोर्ड वर २३२ धावा लावल्या होत्या. सामना जिंकण्यासाठी केवळ १ धावेची आवश्यकता होती. तर वेस्ट इंडिज संघाला सामना टाय करण्यासाठी १ विकेटची आवश्यकता होती. ऑस्ट्रेलियन फलंदाजाने लेग साईडच्या दिशेने शॉट मारला आणि धाव घेण्याचा प्रयत्न केला. परंतु तिथे क्षेत्ररक्षण करत असलेल्या सॉलोमनने फलंदाजाला बादवबाद करत माघारी धाडले. अशाप्रकारे हा सामना अनिर्णीत राहिला. हा सामना कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील पहिला अनिर्णीत सामना ठरला.
अनेकांना ही बाब माहीत नसावी भारतीय संघाचा देखील एक कसोटी सामना अनिर्णीत राहिला आहे. तो सामना कुठल्या संघाविरुद्ध पार पडला होता? कमेंट करून नक्की कळवा.
