आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आक्रमक फलंदाज म्हणून ओळखल्या जाणारा फलंदाज वीरेंद्र सेहवाग हा सचिनला आपला आदर्श मानायचा. सेहवागला घडविण्यात सचिनचा देखील मोलाचा वाटा आहे. सेहवागला देखील सचिन तेंडुलकर सारखीच फलंदाजी करायची होती. हे आम्ही नाही तर, स्वतः वीरेंद्र सेहवाग म्हणाला आहे. सेहवागने ठरवले होते की, सचिनच्या पावलांवर पाऊल देत पुढे जायचं. वनडे क्रिकेटमध्ये पहिले दुहेरी शतक झळकावण्याचा विक्रम हा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावे आहे. हा विक्रम सचिनला आदर्श माननाऱ्या वीरेंद्र सेहवागने आजच्याच दिवशी मोडून काढला होता.
वीरेंद्र सेहवागने आजच्याच दिवशी म्हणजे ८ डिसेंबर २०११ रोजी वेस्ट इंडीज विरुध्द झालेल्या सामन्यात तुफानी खेळी करत दुहेरी शतक झळकावले होते. त्यावेळी वनडे क्रिकेटमध्ये दुहेरी शतकी खेळी करणारा तो केवळ दुसराच फलंदाज ठरला होता. तर सचिन तेंडुलकरने २०१० मध्ये दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध नाबाद २०० धावांची खेळी केली होती.
होळकर स्टेडियमवर केली होती ऐतिहासिक खेळी...
भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांमधील हा सामना इंदौरच्या होळकर स्टेडियमवर पार पडला होता. त्यावेळी भारताचा कर्णधार एमएस धोनी काही कारणास्तव हा सामना खेळू शकला नव्हता. त्यामुळे संघाची जबाबदारी वीरेंद्र सेहवागच्या हाती देण्यात आली होती. सेहवागने नाणेफेक जिंकले आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सचिन देखील या सामन्यात संघाबाहेर होता. त्यामुळे गौतम गंभीर आणि वीरेंद्र सेहवागची जोडी मैदानात आली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी १७६ धावांची भागीदारी केली.
गंभीर ६७ धावा करून माघारी परतला मात्र वीरेंद्र सेहवागचं आक्रमण थांबता थांबत नव्हतं. त्याने या डावात १४९ चेंडूंचा सामना करत २५ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने २१९ धावांची तुफानी खेळी केली होती. मात्र ४७ व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर तो बाद होऊन माघारी परतला होता.
वीरेंद्र सेहवागच्या या अविश्वसनीय खेळीच्या जोरावर भारतीय संघाने ५० षटक अखेर ५ गडी बाद ४१८ धावा केल्या होत्या. या डोंगराइतक्या धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिज संघ ४९.२ षटकात अवघ्या २६५ धावांवर संपुष्टात आला. भारतीय संघासाठी रवींद्र जडेजा आणि राहुल शर्माने प्रत्येकी ३-३ गडी बाद केले होते. तर रैना आणि अश्विनला १-१ गडी बाद करण्यात यश आले होते.
सचिन आणि वीरेंद्र सेहवाग नंतर रोहित शर्माने देखील दुहेरी शतकी खेळी केली आहे. त्याने आतापर्यंत ३ वेळेस हा पराक्रम केला आहे.




