आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्या भारतीय संघाची हवा आहे. भारतीय संघ वनडे आणि टी -२० रँकिंगमध्ये अव्वल तर कसोटी रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानी आहे. एक मजबूत संघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीय संघाने गेल्या २ महिन्यांमध्ये दोन संघांना धूळ चारली आहे. आता ऑस्ट्रेलियाला धूळ चरण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरला आहे. सध्या भारतीय संघ मिळेल त्या संधीचं सोनं करतोय. मात्र ४५ वर्षांपूर्वी मिळालेल्या संधीचा भारतीय संघाला दोन्ही हातांनी स्वीकार करता आला नाही. नेमकं काय घडलं चला जाणून घेऊया.
क्रिकेटची नोंद ठेवणाऱ्या पुस्तकात असे लिहिले गेले आहे की, ४५ वर्षांपूर्वी भारतीय संघाने ती चूक केली नसती तर, भारतीय संघाची इतिहासात नोंद झाली असती. त्यावेळी भारतीय संघाने असा काही पराक्रम केला असता, जो आजवर होऊ शकला नाहीये. आता तुम्हालाही विचार पडला असेल की, नक्की असं काय घडलं? तर विषय कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात यशस्वी धावांचा पाठलाग करण्याचा आहे.
ऍडीलेड कसोटीत भारताने हुकवली विजयाची संधी..
१९७८ साली भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ऍडीलेडच्या मैदानावर कसोटी सामना पार पडला. त्यावेळी भारतीय संघाचे नेतृत्व करत असलेल्या बिशन सिंग बेदींच्या संघाने ऑस्ट्रेलिया संघाला जखडून ठेवले होते. ५ कसोटी सामन्यांची मालिका २-२ ने बरोबरीत होती. त्यामुळे अंतिम कसोटी सामना जिंकून भारतीय संघाला इतिहास रचण्याची संधी होती. या कसोटी सामन्याचा निकाल ३ फेब्रुवारी रोजी लागला होता. त्यावेळी कसोटी सामना ६ दिवसांचा असायचा.
ऐतिहासिक विजय मिळवण्याची संधी हुकली..
ऍडीलेडच्या मैदानावर पार पडलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने प्रथम फलंदाजी करताना ५०५ धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरात भारतीय संघाचा डाव २६९ धावांवर संपुष्टात आला. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी दुसऱ्या डावात कंबर करत ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २५६ धावांवर रोखला.
अशाप्रकारे भारतीय संघाला विजय मिळवण्यासाठी ४९३ धावांचा पाठलाग करायचा होता. मात्र भारतीय फलंदाजांना केवळ ४४५ धावा करता आल्या. भारतीय संघाला इतिहास रचण्यासाठी केवळ ४८ धावा कमी पडल्या. भारतीय संघाने जर या धावांचा यशस्वी पाठलाग केला असता तर भारतीय संघाची इतिहासात नोंद झाली असती. कारण धावांचा पाठलाग करताना ४०० पेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग करणं खूप मोठी गोष्ट आहे.
सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात मोठ्या आव्हानाचा पाठलाग करण्याचा विक्रम हा वेस्ट इंडिज संघाच्या नावे आहे. वेस्ट इंडिज संघाने २००३ मध्ये ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध ४१८ धावांचा यशस्वी पाठलाग केला होता.
