भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ४ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने जोरदार कामगिरी करत १ डाव आणि १३२ धावांनी विजय मिळवला. या मैदानावर ऑस्ट्रेलियाचे फलंदाज धावा करण्यात फ्लॉप ठरत असताना रोहित शर्मा, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला.
हा मालिकेतील पहिला सामना होता. तर आणखी ३ सामने शिल्लक आहेत. या सामन्यांमध्ये काही फलंदाज आहेत जे धावांचा पाऊस पाडताना दिसून येऊ शकतात. बोभाटाच्या या लेखात आम्ही तुम्हाला अशा ५ फलंदाजांबद्दल माहिती देणार आहोत. जे बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा करू शकतात.
१) रोहित शर्मा :
नागपूर कसोटीतील पहिल्या डावात रोहितने शर्माने जोरदार पुनरागमन केले आहे. पहिल्या डावात फलंदाजी करताना त्याने १२० धावांची तुफानी खेळी केली. त्याने कसोटीतील शेवटचे शतक २०२१ मध्ये झळकावले होते. आता २ वर्षांनंतर शतक झळकावत त्याने फॉर्ममध्ये आल्याचे संकेत दिले आहेत. ही सुरुवात पाहता अशी शक्यता वर्तवली जात आहे की, तो या मालिकेत धावांचा पाऊस पाडेल.
२) मार्नस लाबुशेन :
ऑस्ट्रेलिया संघाला जर या मालिकेत चांगली कामगिरी करायची असेल तर,मार्नस लाबुशेनला चांगली कामगिरी करावी लागणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात त्याने एकाकी झुंज देत ४९ धावांची खेळी केली होती. मात्र त्याला मोठी खेळी करता आली नाही. उर्वरित सामन्यांमध्ये त्याच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष लागून असणार आहे.
३) स्टीव्ह स्मिथ:
ऑस्ट्रेलिया संघातील अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथ जेव्हा जेव्हा भारतीय संघाविरुद्ध खेळतो, त्यावेळी तो धावांचा पाऊस पाडत असतो. २०१७ मध्ये झालेल्या कसोटी मालिकेत त्याने सर्वाधिक ४९९ धावा केल्या होत्या. यावेळी त्याला चांगली सुरुवात करता आली नाहीये. पहिल्या डावात त्याला केवळ ३७ धावांची खेळी करता आली. मात्र त्याच्याकडे भारतात खेळण्याचा तगडा अनुभव आहे. त्यामुळे तो लवकरच जोरदार पुनरागमन करू शकतो.
४) केएल राहुल :
भारतीय संघाचा उपकर्णधार आणि सलामीवीर फलंदाज केएल राहुल गेल्या काही महिन्यांपासून फ्लॉप ठरतोय. ऑस्ट्रेलिया विरुध्द झालेल्या पहिल्या सामन्यात त्याला चांगली सुरुवात मिळाली होती. मात्र त्याला मोठी खेळी करता आली नाही. त्याने हा डावात २० धावांची खेळी केली. मात्र केएल राहुल सारखा फलंदाज केव्हा ही पुनरागमन करून मोठी खेळी करू शकतो.
५) रवींद्र जडेजा:
रवींद्र जडेजाने तब्बल ५ महिन्यांनंतर भारतीय संघात पुनरागमन केले आहे. पहिल्याच सामन्यात त्याने गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये जोरदार कामगिरी केली आहे. पहिल्या डावात त्याने ५ गडी बाद करत अर्धशतक झळकावले. त्याच्या फलंदाजीचा फॉर्म पाहता, तो या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरू शकतो.
काय वाटतं, भारतीय संघ ही मालिका जिंकून विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश करेल का? कमेंट करून नक्की कळवा.




