आऊट ऑफ फॉर्म विराट कोहली अजूनही आहे टी -२० क्रिकेटचा बॉस; विश्वास बसत नसेल तर हे आकडे पाहा..

आऊट ऑफ फॉर्म विराट कोहली अजूनही आहे टी -२० क्रिकेटचा बॉस; विश्वास बसत नसेल तर हे आकडे पाहा..

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली हा गेल्या काही महिन्यांपासून साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरत आहे. २०१९ नंतर त्याला एकही शतक झळकावता आले नाहीये. मात्र केवळ शतक झळकावणारा फलंदाज श्रेष्ठ असतो का? नाही ना? विराट कोहली शतक झळकावण्यात अपयशी ठरत असला तरीदेखील तो नेहमी छोटी मोठी खेळी करत भारतीय संघाच्या विजयात मोलाचे योगदान देत आहे. फॉर्ममध्ये नसलेला विराट कोहली धावा करण्याच्या बाबतीत फॉर्ममध्ये असलेल्या फलंदाजांना टक्कर देताना दिसून येत आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे ४४ खेळाडू आहेत ज्यांनी तीनही फॉरमॅटमध्ये १००० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. या फलंदाजांच्या यादीत विराट कोहली हा एकमात्र असा फलंदाज आहे ज्याने या धावा ४५ पेक्षा अधिकच्या सरासरीने केल्या आहेत.

टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळेस मालिकावीर पुरस्कार..

आपण जेव्हा टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटबद्दल बोलतो तेव्हा विराट कोहली हे नाव सर्वात पुढे असतं. कारण टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहली हा एकमेव क्रिकेटपटू आहे ज्याने ६ वेळेस मालिकावीर पुरस्कार पटकावण्याचा पराक्रम केला आहे.

टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चेजमास्टर आहे विराट...

विराट कोहलीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चेजमास्टर म्हणून ओळखले जाते. तसेच आपण जेव्हा टी -२० क्रिकेटबद्दल बोलतो, तेव्हा विराट कोहलीची सरासरी ७८ ची आहे. तर दुसऱ्या स्थानी असलेल्या फलंदाजाची सरासरी केवळ ४८ पेक्षा अधिक आहे. तर टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करताना एमएस धोनी सरासरीच्या बाबतीत तिसऱ्या स्थानी आहे. हे झालं टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करताना सरासरी. जेव्हा आपण धावांचा पाठलाग करताना विजय मिळवून देण्याबाबत बोलतो. अशा स्थितीत विराटची सरासरी ९७ पेक्षा अधिक आहे. या यादीत इंग्लंड संघातील विस्फोटक फलंदाज जोस बटलर दुसऱ्या स्थानी आहे. जोस बटलरने ७८.३३ च्या सरासरीने धावा केल्या आहेत.

टी -२० विश्वचषक स्पर्धेत विराट कोहली आहे 'बॉस'

यावर्षी ऑक्टोबर - नोव्हेंबर महिन्यात आयसीसी टी -२० विश्वचषक स्पर्धा पार पडणार आहे. या स्पर्धेत विराट कोहली भारतीय संघासाठी महत्वाचा खेळाडू ठरू शकतो. कारण टी -२० विश्वचषक स्पर्धेत विराट कोहली बॉस आहे. या स्पर्धेत त्याने ७८.८१ च्या सरासरीने धावा केल्या आहेत. या बाबतीत ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज माईक हसी दुसऱ्या स्थानी आहे. तसेच विराट कोहलीच्या नावे आयसीसी टी -२० विश्वचषक स्पर्धेच्या एकाच हंगामात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आहे. विराट कोहलीने २०१४ मध्ये झालेल्या टी -२० विश्वचषक स्पर्धेत ३१९ धावा केल्या होत्या.

दोन वेळेस पटकावलाय प्लेअर ऑफ टुर्नामेंटचा पुरस्कार..

विराट कोहली भारतीय संघाला टी -२० विश्वचषक स्पर्धा जिंकून देण्यात अपयशी ठरला आहे. मात्र त्याच्या प्रयत्नात कुठलीही कमतरता पाहायला मिळाली नाहीये. त्याने आतापर्यंत दोन वेळेस प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार पटकावला आहे. त्याने हा पुरस्कार २०१४ आणि २०१६ मध्ये झालेल्या टी -२० विश्वचषक स्पर्धेत पटकावला होता.

आशिया चषक २०२२ स्पर्धेतील पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यात विराट कोहलीने चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे अशी आशा व्यक्त केली जात आहे की, आगामी टी -२० विश्वचषक स्पर्धेत तो चांगली कामगिरी करू शकतो.