भारतात क्रिकेट हा खेळ किती लोकप्रिय आहे हे सांगण्याची गरज नाही. पण या लोकप्रियतेत सहसा फिट बसतात हे बॅट्समन. बॉलर्सच्या वाट्याला तुलनेत तितकी लोकप्रियता येत नाही. मात्र त्यातही काही बॉलर्स असतात तुफान लोकप्रिय होतात, अनिल कुंबळे, हरभजन सिंग हे नावे त्यात घेता येतील. याच यादीतील एक नाव म्हणजे जवागल श्रीनाथ!!
जवागल श्रीनाथ क्रिकेट संघात दाखल झाला तेव्हापासून क्रिकेटमध्ये कर्नाटकचे खेळाडू चमकू लागले. व्यंकटेश प्रसाद हा भेदक बॉलर, तसेच पुढे भारताची भिंत बनलेला राहुल द्रविड हे श्रीनाथची कर्नाटकी परंपरा पुढे घेऊन जाणारे खेळाडू म्हटले तर गैर होणार नाही.
कर्नाटकातील म्हैसूर येथे जन्मलेल्या श्रीनाथची तुफान बॉलिंग पाहून त्याला म्हैसूर एक्सप्रेस हे नाव आपोआप लाभले. एकूण ६२ टेस्ट आणि २२९ वनडे अशी भरभक्कम कारकीर्द करणाऱ्या श्रीनाथने या दरम्यान अनेक विक्रम केले आहेत.
श्रीनाथने क्रिकेटमध्ये पदार्पण केले ते साल होते १९९२. भारताचा पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध त्याने पदार्पण केले, पण या सामन्यात त्याला छाप पाडता आली नाही. पुढे मात्र त्याचा करिष्मा दिसला. भारताकडून वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत श्रीनाथ कुंबळे नंतर तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने एकूण ३१५ विकेटस् घेतल्या आहेत.
श्रीनाथच्या नावावर असलेला अजून एक विक्रम म्हणजे ज्यांनी भारतासाठी सर्वाधिक वर्ल्डकप खेळले आहेत त्यात त्याचे नाव सर्वात वरच्या स्थानी आहे.. १९९२ साली त्याने वनडे खेळायला सुरुवात केली आणि याचवर्षी तो वर्ल्डकप संघाचा भाग झाला. नंतर १९९६, १९९९ आणि २००३ असा त्याचा प्रवास होता. या काळात त्याने भारतासाठी वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम स्वतःच्या नावे केला. ३४ सामन्यांमध्ये त्याने ४४ विकेट घेतल्या आहेत.





