राहुलच्या फटकेबाजीने काढली मुंबईच्या गोलंदाजांची हवा! १०० व्या सामन्यात केला खास पराक्रम

राहुलच्या फटकेबाजीने काढली मुंबईच्या गोलंदाजांची हवा! १०० व्या सामन्यात केला खास पराक्रम

आयपीएल २०२२ स्पर्धेतील २६ वा सामना मुंबई इंडियन्स (Mumbai indians)  आणि लखनऊ सुपरजायंट्स (Lucknow super giants) या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात लखनऊ सुपरजायंट्स संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटक अखेर ४ बाद १९९ धावा केल्या होत्या. दरम्यान लखनऊ सुपरजायंट्स संघाचा कर्णधार केएल राहुल (Kl Rahul) याने आपल्या १०० व्या सामन्यात शतक साजरे केले. यासह त्याच्या नावे एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. (kl Rahul century) 

आयपीएल २०२२ स्पर्धेतील ५ सामन्यात केएल राहुलला एकही मोठी खेळी करता आली नव्हती. त्यामुळे चाहत्यांची देखील अशी इच्छा होती की, केएल राहुलने मोठी खेळी करावं. चाहत्यांची अपेक्षा पूर्ण करत मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात केएल राहुलने धावांचा पाऊस पाडत, १०३ धावांची खेळी केली. हा त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील १०० वा सामना होता. यासह १०० व्या आयपीएल सामन्यात शतक झळकावणारा केएल राहुल पहिलाच खेळाडू ठरला आहे.

मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर केएल राहुल नावाचे वादळ घुंगवले. त्याने ६० चेंडूंचा सामना करत ९ चौकार आणि ५ षटकारांच्या साहाय्याने १०३ धावांची खेळी केली. हे त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील तिसरे शतक आहे. तर आयपीएल २०२२ स्पर्धेतील हे कुठल्याही फलंदाजाने झळकावलेले दुसरे शतक आहे. यापूर्वी राजस्थान रॉयल्स संघाचा विस्फोटक फलंदाज जोस बटलर याने मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात शतक झळकावले होते.