आयपीएल २०२२ स्पर्धेचा २६ वा सामना मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला सलग सहाव्यांदा पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला विजयासाठी २०० धावांची आवश्यकता होती. परंतु मुंबई इंडियन्स संघाला १८ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे.
पाच वेळेस आयपीएल स्पर्धेचे जेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाची ही आतापर्यंतची सर्वात खराब कामगिरी आहे. या हंगामात हा मुंबई इंडियन्स संघाचा सलग सहावा पराभव आहे. तर लखनऊ सुपर जायंट्स संघाचा हा या स्पर्धेतील तिसरा विजय आहे.
या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरवत लखनऊ सुपर जायंट्स संघातील फलंदाजांनी तुफान फटकेबाजी केली. लखनऊ सुपर जायंट्स संघाकडून कर्णधार केएल राहुलने सर्वाधिक १०३ धावांचे योगदान दिले. तर मनीष पांडेने ३८ आणि क्विंटन डी कॉकने २४ धावांचे योगदान दिले. या खेळीच्या जोरावर लखनऊ सुपर जायंट्स संघाने २० षटक अखेर ४ बाद १९९ धावा केल्या होत्या.
या धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्स संघाकडून एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. २० षटक अखेर मुंबई इंडियन्स संघाला केवळ ९ बाद १८१ धावा करण्यात यश आले. मुंबई इंडियन्स संघाकडून सूर्यकुमार यादवने सर्वाधिक ३७ धावांचे योगदान दिले. तर देवाल्ड ब्रेविसने ३१ धावांचे योगदान दिले.




