नोवाक जोकोविच, रॉजर फेडरर, राफेल नदाल ही टेनिसमधील दिग्गज नावे आहेत. जगातल्या अगदी काही मोजक्या लोकांना या खेळाडूंबद्दल माहिती नसेल. टेनिसमधील अनेक ग्रँडस्लॅम जिंकत हे खेळाडू सातत्याने टेनिसमधील आपले कौशल्य सिद्ध करत आहेत. पण या खेळाडूंनंतर कोण असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे. त्याला उत्तरही तयार होत आहे आणि विशेष म्हणजे त्याचे कनेक्शन हे भारताशी आहे.
समीर बॅनर्जी नावाच्या एका भारतीय वंशाच्या अमेरिकन खेळाडूने विम्बल्डन ज्युनियर ग्रॅण्डस्लम टायटल जिंकले आहे. व्हिक्टर लिलोव याला फायनलमध्ये हरवल्यावर हा किताब त्याच्या नावे जमा झाला. हे त्याचे पहिलेच मोठे यश असल्याने जगभर त्याची दखल घेतली जात आहे. समीर अवघ्या १७ वर्षांचा आहे. यावर्षी झालेल्या फ्रेंच ओपन स्पर्धेत पहिल्याच राउंडमध्ये हरल्यावर त्याचे हे यश दैदीप्यमान म्हणावे असे आहे.

