स्वयंपाक हा महिलांचा प्रांत समजला जातो. 'सुगरण' हा शब्द उच्चारला की आई, ताई, मावशी, आत्या, आजी हेच समोर येतात. पण कित्येक पुरुषांनाही स्वयंपाकात तितकाच रस असतो. तेही वेळ पडते तेव्हा उत्तम स्वयंपाक बनवतात. हॉटेल व्यवसाय पाहिलात तर तिथले स्वयंपाकी किंवा शेफ हे पुरुषच असतात. आता बातमी अशी आहे की, ऑस्ट्रेलियात मास्टरशेफ ऑस्ट्रेलिया शो च्या १३ व्या सिझनमध्ये बाजी मारली आहे ती एका पुरुषाने. महत्त्वाचे म्हणजे हा एक २७ वर्षांचा भारतीय वंशाचा तरुण आहे. त्याचे नाव आहे जस्टीन नारायण.
जस्टीन नारायण याने मास्टरशेफ ऑस्ट्रेलियाचे विजेतेपद जिंकून नावलौकिक मिळवला आहे. त्याने ट्रॉफी आणि तब्बल १.८६ कोटी रुपये जिंकले आहेत. त्याच्यासोबत अनेक जण या शो मध्ये सहभागी झाले होते. पण जस्टीनने आपल्या पाक कौशल्याने सर्वांना मागे टाकले. विशेष करून जजेसना भारतीय पद्धतीचे पदार्थ जास्त आवडले.






