आशिया चषक २०२२ स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी धावांचा पाऊस पाडल्याचे पाहायला मिळाले आहे. मात्र तुम्हाला माहीत आहे का? या स्पर्धेत सर्वाधिक शतके झळकावणाचा विक्रम कुठल्या फलंदाजाच्या नावे आहे? नाही ना? आम्ही तुम्हाला या स्पर्धेत सर्वाधिक शतक झळकावणाऱ्या टॉप ५ फलंदाजांबद्दल माहिती देणार आहोत. चला तर पाहूया.
सनथ जयसूर्या (Sanath jayasurya) :
श्रीलंका संघातील दिग्गज फलंदाज सनथ जयसूर्या हा आशिया चषक स्पर्धेत सर्वाधिक शतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सर्वोच्च स्थानी आहे. सनाथ जयसूर्याने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक दिग्गज गोलंदाजांचा समाचार घेतला आहे. तसेच आशिया चषक स्पर्धेत देखील त्याची बॅट चांगलीच तळपली. त्याने या स्पर्धेतील २५ सामन्यांतील २४ डावांमध्ये १२२० धावा केल्या. यादरम्यान त्याने ६ शतके झळकावली.
कुमार संगकारा (Kumar Sangakkara) :
श्रीलंका संघाचा माजी कर्णधार आणि यष्टिरक्षक फलंदाज कुमार संगकारा या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. श्रीलंका संघाला आशिया चषक जिंकून देण्यात कुमार संगकाराने मोलाची भूमिका बजावली आहे. त्याच्या या स्पर्धेतील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर त्याने २३ सामन्यांमध्ये १०७५ धावा केल्या. यादरम्यान त्याने ४ शतके झळकावण्याचा पराक्रम केला.
शोएब मलिक (Shoaib Malik):
पाकिस्तान संघाचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू शोएब मलिकचा देखील आशिया चषक स्पर्धेत दबदबा पाहायला मिळाला आहे. त्याने अनेकदा पाकिस्तान संघासाठी मोलाची भूमिका बजावली आहे. या स्पर्धेत पाकिस्तान संघाचे प्रतिनिधित्व करताना त्याने २१ सामन्यांतील २१ डावांमध्ये ९०७ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ३ शतके देखील झळकावली आहेत.
विराट कोहली (Virat Kohli) :
भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली गेल्या काही महिन्यांपासून साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरत आहे.मात्र आशिया चषक स्पर्धेत त्याचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. जेव्हा जेव्हा भारतीय संघ अडचणीत सापडला आहे त्यावेळी विराट कोहली भारतीय संघासाठी संकटमोचक ठरला आहे. त्याने या स्पर्धेत फलंदाजी करताना ६ सामन्यांतील ४ डावांमध्ये ७६६ धावा केल्या आहेत. यासह तीन शतके देखील झळकावली आहेत. तो आशिया चषक २०२२ स्पर्धेत खेळताना दिसून येणार आहे. त्यामुळे शतकांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) :
भारतीय संघाचा मास्टर ब्लास्टर म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर याने २३ सामन्यांतील २१ डावांमध्ये ९७१ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने २ शतके झळकावली आहेत.
काय वाटतं? विराट कोहली आशिया चषक स्पर्धेत सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थान मिळवू शकतो का? कमेंट करून नक्की कळवा.




