ऑलिंपिक २०१६ : भारतीय संघाचे वेळापत्रक -शनिवार ६ ऑगस्ट ते रविवार ७ ऑगस्ट सकाळ

लिस्टिकल
ऑलिंपिक २०१६ : भारतीय संघाचे वेळापत्रक -शनिवार ६ ऑगस्ट ते रविवार ७ ऑगस्ट सकाळ

ऑलिंपिक गाईडमुळे तुम्हाला खेळांची माहिती झाली असेलच. आणि आता प्रत्यक्ष खेळ बघायची उत्सुकताही असेल. ऑलिंपिक उद्घाटन ब्राझीलमध्ये संध्याकाळी असलं तरी तेव्हा आपल्याकडे शनिवार उजाडलेला असेल. यावेळचे ऑलिंपिक्स आपल्या संध्याकाळपासून दुसर्‍या दिवशी पहाटेपर्यंत चालेल. त्यामुळे भारतीय क्रिडाप्रेमींचे येत्या काही दिवस जागरण होऊ शकते. पण फुटबॉल वर्ल्डकप असो किंवा वेस्ट इंडीजला चाललेली क्रिकेटमॅच. भारतीय क्रिडाप्रेमींना आपल्या आवडत्या खेळासाठी आणि खेळाडूंसाठी जागरणं काही नवी नाहीत.

बोभाटावर आपण पाहणार आहोत, दररोज भारताचे कोणकोणते खेळाडू खेळणार आहेत आणि त्या खेळाच्या भा.प्र.वे.नुसार काय वेळा असतील तेही बोभाटा तुम्हाला सांगेल. तुम्हाला फक्त इतकंच करायचंय रोज दुपारी बोभाटाला भेट द्या आणि त्या दिवशी संध्याकाळपासून कोणते खेळ बघता येतील याची माहिती तयार मिळवा.

चला तर आज बघूया उद्या भारतात शनिवार दि.६ ऑगस्टला काय बघाल...

उद्घाटन सोहळा

शनिवार ६ ऑगस्ट,  सकाळी ४:३० - आपल्याकडे शनिवारी पहाटे ऑलिंपिक्स उद्घाटन सोहळ्याचं थेट प्रक्षेपण होईल. आपल्याकडे सकाळी ४:३० वाजल्यापासून तुम्ही हे प्रक्षेपण पाहू शकाल. जर तुम्हाला शनिवारी सुट्टी असेल तर हा सोहळा अजिबात चुकवू नका असे मी सांगेन. ब्राझील या देशाला फार जुनी संस्कृती आहेच, शिवाय तेथील मोकळे वातावरण, विविधतेने भरलेली खाद्य संस्कृती, तेथील मादक नृत्यसंस्कृती, कार्निवल डान्स, गाणी आदींची रेलचेल या सोहळ्यात असेल असा अंदाज आहे.

ब्राझिलवेळेनुसार सकाळी म्हणजे भारतात संध्याकाळपासून वेगवेगळ्या खेळांना सुरूवात होईल.

हॉकी

शनिवार ६ ऑगस्ट , संध्याकाळी ७:३०- संध्याकाळी ७:३० वाजताच पुरुष हॉकीमध्ये भारत विरुद्ध आयर्लंड मॅचही चालू होईल.

रोईंग

शनिवार ६ ऑगस्ट : संध्याकाळी ५:०० - पुरुष सिंगल स्कल स्पर्धेत दत्तू भोकानल संध्याकाळी ५ वाजल्यापासून सहभागी होईल.

नेमबाजी (शूटिंग):

 शनिवार ६ ऑगस्ट : संध्याकाळी ५:०० -  संध्याकाळी महिला १० मी. एअर रायफल स्पर्धेला संध्याकाळी ५ ला सुरूवात होईल. शनिवारी याच्या क्वालिफिकेशन म्हणजे पात्रता फेरीपासून अंतिम फेरीपर्यंत सर्व फेर्‍या होतील. यात भारतातर्फे अयोनिका पॉल सहभागी होईल.

 शनिवार ६ ऑगस्ट : रात्री ९:३० -    पुरूष १० मी. एअर रायफल स्पर्धेला सुरूवात होईल. शनिवारी याच्या क्वालिफिकेशन म्हणजे पात्रता फेरी पासून सुरूवात होऊन दिवसाखेर पदक प्रदान होईल. यात भारतातर्फे जितू राज सहभागी असेल.

टेबल टेनिस

 शनिवार ६ ऑगस्ट : रात्री ७:३०  -  साधारण त्याच सुमारास टेबलटेनिसमध्ये महिला गटात मौमा दास रोमानियाच्या खेळाडूसोबत एकेरी मॅच खेळेल. तर महिला एकेरी बॅडमिंटनस्पर्धेत पी.व्ही.सिंधू एका पाठोपाठ एक अशा दोन मॅचेस खेळेल. 

रविवार ७ ऑगस्ट: रात्री १२:३० वाजता- पुरुष टेबलटेनिसच्या एकेरी स्पर्धेत सौम्यजीत घोष आपल्या थायलंडच्या प्रतिस्पर्ध्याशी भिडेल.

टेनिस

शनिवार ६ ऑगस्ट : संध्याकाळी ७:३०-  टेनिस पुरुष दुहेरी स्पर्धेत भारतातर्फे लिएंडर पेस आनि रोहन बोपन्ना आपली पहिली मॅच खेळतील. त्यांच्यासमोर पोलंडची जोडी खेळेल. 

रविवार ७ ऑगस्ट: पहाटे १:३० वाजता- महिला दुहेरी टेनिस स्पर्धेत सानिया मिर्झा आणि प्रार्थना ठोंबरे आपल्या चायनीज प्रतिस्पर्ध्यांविरुद्धा आपली पहिली मॅच खेळतील.

​​​​​​​पदकाच्या अपेक्षा

आज ज्या स्पर्धांमध्ये पदके प्रदान होणार आहेत त्यापैकी केवळ शूटिंगमध्ये भारताचा सहभाग आहे. त्यात आयोनिका व जितू राज चांगले खेळाडू असले तरी त्यांनी पदक मिळवण्याबद्दल साशंकता आहे. त्यामुळे पहिल्या दिवशी भारताला एकही पदक मिळेल असे वाटत नाही.