क्रिकेटच्या खेळात अनेक महान खेळाडू होऊन गेले. या खेळाडूंना बघून भारतातील लाखो मुलं क्रिकेटर होण्याची स्वप्नं पाहात असतात. दुसरीकडे असेही खेळाडू आहेत, जे जोरदार एन्ट्री करतात पण काही काळाने कुठे गायब होतात काही कळत नाही. हे वाचून अनेक खेळाडू तुमच्या डोळ्यांसमोरून तरळून गेले असतील.
नरेंद्र हिरवानी हे नाव तसे आजच्या पिढीला माहीत असण्याचे काही कारण नाही. पण ९० च्या दशकात क्रिकेट बघत मोठ्या झालेल्या लोकांना मात्र तो आठवत असेल. आज आठवणार नाही इतका दुर्लक्षित झाला असला तरी आपल्या पहिल्याच सामन्यात त्याने तुफान हवा केली होती.
एक काळ होता जेव्हा वेस्ट इंडिजला हरवणे हे म्हणजे दिव्य काम समजले जात असे. त्याकाळी म्हणजे १९८८ साली नरेंद्र हिरवानी याने आपल्या पहिल्याच टेस्ट सामन्यात १६ विकेट घेत 'एकच फाईट वातावरण टाईट' अशी किमया करून दाखवली होती. दोन्ही इनिंग्समध्ये ८-८ विकेट घेत भारताच्या विजयात त्याने सिंहाचा वाटा उचलला होता.
ही सिरीज हिरवानीने एकतर्फी गाजवली होती. कारण सलग ३ सामन्यांमध्ये ४ विकेट घेणारा तो एकमेव भारतीय बॉलर ठरला होता. साहजिक तोच मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला. आता वेस्ट इंडिजला इतका जबरदस्त दणका देणारा बॉलर ठरल्यावर पठ्ठ्या देशभर सुपरहिट झाला.




