ऑगस्ट ७, १९७४ ची सकाळ : फिलिप पेटीट, नावाचा एक फ्रेंच 'रोड आर्टिस्ट', मॅनहॅटनच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या दक्षिणकडल्या टॉवरच्या छतावरून खाली उतरला. काळ्या रंगाचे कपडे घातलेला आणि हातात तोल सांभाळण्यासाठीची लांब काठी घेऊन, फिलिप पेटिटने इतिहासातील प्रसिद्ध 'हाय-वायर वॉक'ला (म्हणजे डोंबार्यासारखे दोरावरून चालणे) सुरुवात केली. जमीनीपासून १३५०फूट उंचीवरून, तारेच्या रस्सीवरून ट्विन टॉवरच्या एका टॉवरपासून दुसर्या टॉवरकडे चालत गेला.
अर्थातच हे सर्व करण्याची परवानगी त्यानी घेतलीच नव्हती आणि कोणी दिलीही असती. आपल्या काही मित्रांसोबत तो रात्री एका टॉवरच्या शेवटच्या मजल्यावर घुसला होता. धनुष्यबाणाच्या साह्याने एक रस्सी त्यानी इकडून तिकडे फेकली. त्यानंतर एक इंच जाडीची स्टीलची वायर जोडून ओढून घेतली आणि दोन्ही टॉवरच्यामध्ये टाकून ठेवली.

