आज जागतिक युवक दिवस आहे. आजच्या दिवशी एका अशा युवकाची गोष्ट सांगावी लागते आहे की ज्याने केलेले प्रयत्न अफलातून होते पण त्याचा प्रयोग पूर्ण होण्यापूर्वीच तो या जगातून निघून गेला. ....आणि त्याचा प्रयोग अपूर्णच राहिला. त्याची गोष्ट आज सांगणे हा विचित्र दैवदुर्विलास आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील इस्माईल शेख हा तरुण काल संपूर्ण महाराष्ट्राला माहीत झाला. जर त्याचा प्रयत्न यशवंतराव झाला असता तर तो वेगळ्या कारणाने महाराष्ट्राला माहिती झाला असता. यवतमाळ सारख्या विकसनशील जिल्ह्यात राहून त्याने स्वतःच्या हुशारी आणि मेहनतीने हेलिकॉप्टर तयार केले होते. याच हेलिकॉप्टरची ट्रायल घेत असताना झालेल्या अपघातात त्याचा मृत्यू झाला आहे.
इस्माईल खूप शिक्षित होता असे नाही. अवघे ८ वीपर्यंत शिक्षण घेतलेला इस्माईल केवळ उच्चशिक्षण घेऊनच काही नवे इनोव्हेशन करता येते या समजाला छेद देणारा तरुण होता. यवतमाळ येथे फुलसावंगी येथील इस्माईल लहानपणापासून आकाशात उडणाऱ्या हेलिकॉप्टर, विमानांकडे बघून विस्मयचकीत होत असे. इस्माईल वयात येत असताना वेल्डिंग आणि फेब्रिकेशनचे काम करायला लागला. या दरम्यान त्याचे शिक्षण अपोआप सुटले.





