भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली हा सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. त्याच्या नावे अनेक मोठ मोठे विक्रम आहेत. तसेच पाकिस्तान संघाचा माजी गोलंदाज शोएब अख्तर देखील आपल्या काळात सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक होता. त्याचा गोलंदाजीसमोर दिग्गज फलंदाज थर थर कापायचे. २०११ विश्वचषक स्पर्धा झाल्यानंतर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम केले होते. सध्या तो समालोचन करताना दिसून येत असतो. नुकताच तो एका खास कारणामुळे चर्चेत आला आहे. त्याने विराट कोहली बद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.
विराट कोहलीने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७० शतक झळकावले आहेत. त्याच्याविरुद्ध गोलंदाजी करताना अनेक दिग्गज गोलंदाज अडचणीत येत असतात. दरम्यान नुकताच शोएब अख्तरने दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले की, "विराट कोहली एक उत्तम आणि चांगला क्रिकेटपटू आहे."
शोएब अख्तरने स्पोर्ट्सकिडाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, " जर मी विराट कोहली विरुद्ध खेळत असतो तर त्याला इतक्या धावा करताच आल्या नसत्या. जर तो माझ्याविरुध्द खेळत असता तर त्याला केवळ २० ते २५ शतक झळकावता आले असते." तसेच त्याने सल्ला देत म्हटले की, विराट कोहलीने एका वेळी एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. असे केले तर त्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडू शकतो. विराट कोहलीच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर त्याने आतापर्यंत ४५८ आंतरराष्ट्रीय सामन्यात ७० शतक झळकावले आहेत.
