आशिया चषक २०२२(Asia Cup 2022) स्पर्धेतील चौथ्या सामन्यात भारत आणि हाँगकाँग (India vs hongkong) हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात भारतीय संघाने जोरदार कामगिरी करत ४० धावांनी विजय मिळवला. हा सामना तर भारतीय संघाने जिंकला मात्र हाँगकाँग संघाने जोरदार कामगिरी करत सर्वांची मने जिंकली आहे. या सामन्यात भारतीय संघाने हाँगकाँग संघाला विजयासाठी १९३ धावांचे आव्हान दिले होते. या धावांचा पाठलाग करताना हाँगकाँग संघाने १५२ धावा केल्या. त्यामुळे हाँगकाँगच संघाचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे. हाँगकाँग संघ जास्त सामने खेळताना दिसून येत नाही. मात्र हाँगकाँग संघाचा इतिहास खूप जुना आहे. आज आम्ही तुम्हाला हाँगकाँग संघाबद्दल काही खास गोष्टी सांगणार आहोत.(Facts about hongkong team)
१) हाँगकाँगला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमी सामने खेळण्याची संधी मिळत आहे. मात्र हाँगकाँगमध्ये १८४१ मध्ये पहिल्यांदा क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर १० वर्षानंतर हाँगकाँग क्रिकेट क्लबची स्थापना करण्यात आली होती.
२) १८९२ साली १० ऑक्टोबर रोजी हाँगकाँग क्रिकेट संघासह १२५ जणांना घेऊन जाणारे जहाज वादळामुळे समुद्रात बुडाले होते. त्या घटनेत हाँगकाँगच्या १३ पैकी ११ खेळाडूंना आपला जीव गमवावा लागला होता.
३)१९२१-२२ दरम्यान हाँगकाँगमध्ये द्वितीय विभागीय लीग क्रिकेटची सुरुवात झाली होती. या लीग स्पर्धेतील पहिला सामना किंग जॉर्ज द फिफ्थ स्कूलमध्ये पार पडला होता.
४) १९६९ मध्ये हाँगकाँग क्रिकेट संघाला आयसीसीने मान्यता दिली होती. त्यानंतर १९८२ मध्ये हाँगकाँग संघाने पहिल्यांदा आयसीसी स्पर्धेचे प्रतिनिधित्व केले होते.
५) २००० हे वर्ष हाँगकाँग संघासाठी अतिशय खास ठरले होते. यावर्षी शारजहामध्ये पार पडलेल्या एसीसी ट्रॉफी स्पर्धेत हाँगकाँग संघ उपविजेता ठरला होता. त्यानंतर २००२ मध्ये पहिल्यांदा हाँगकाँग संघ आशिया चषक स्पर्धेसाठी पात्र ठरला होता.
६) २००४ मध्ये झालेल्या आशिया चषक स्पर्धेत हाँगकाँग संघाने पहिल्यांदा अधिकृत वनडे सामना खेळला होता. हा सामना बांगलादेश संघाविरुद्ध पार पडला होता. मात्र या सामन्यात हाँगकाँग संघाला ११६ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता.
७) तसेच २००६ मध्ये पहिल्यांदा हाँगकाँग संघाने टी -२० क्रिकेट खेळले होते. त्यानंतर २००८ मध्ये हाँगकाँग संघाला आशिया चषक स्पर्धा खेळण्याची संधी मिळाली होती.
८) हाँगकाँग संघाने २०१४ मध्ये झालेल्या विश्वचषकात नेपाळविरुद्ध पहिला टी -२० आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. मात्र, या सामन्यात हाँगकाँग संघाचा डाव ६९ धावांवर संपुष्टात आला होता. हा सामना नेपाळ संघाने ८० धावांनी आपल्या नावावर केला होता.
९) हाँगकाँगने आतापर्यंत एकूण २६ वनडे आणि ५२ टी -२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. टी -२० क्रिकेटमधील २१ सामन्यात या संघाने विजय मिळवला आहे. तर ३१ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.
१०) एजाज खान टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हाँगकाँग संघासाठी सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज आहे. एजाजने आतापर्यंत एकूण ४७ टी -२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ५८ गडी बाद केले आहेत.
हाँगकाँग संघात एकही असा नावाजलेला खेळाडू नाहीये. मात्र अनुभवी भारतीय संघाविरुध्द खेळताना या खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी केली आहे. त्यामुळे भविष्यात नक्कीच या संघाच्या आत्मविश्वासात भर पडेल.
