वनडे क्रिकेट सुरू होऊन ५० पेक्षा अधिक वर्ष झाले आहेत. १९७२ मध्ये मेलबर्नच्या मैदानावर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ वनडे सामना खेळण्यासाठी आमने सामने आले होते. त्यानंतर वनडे क्रिकेटमध्ये अनेक विक्रम बनवले गेले आणि मोडले देखील गेले. आज आम्ही तुम्हाला वनडे क्रिकेटमधील अशा काही फलंदाजांबद्दल माहिती देणार आहोत, ज्यांनी एकत्र फलंदाजी करताना ५००० पेक्षा अधिक धावांची भागीदारी केली आहे.
फलंदाज हे धावा करण्यासाठीच मैदानात उतरतात, हे सर्वांना माहीत आहे. मात्र फलंदाजी करताना भागीदारी करणं देखील एक कला आहे. कारण सोबत असलेल्या फलंदाजाला घेऊन धावांचा डोंगर उभारण्यासाठी संयम ठेवणं गरजेचं असतं. सलामी फलंदाजांच्या बाबतीत हे अधिक घडतं. कारण सलामी जोडीने भागीदारी करत चांगली सुरुवात करून दिली तर, संघाला मोठी धावसंख्या उभारणं सोपं जातं.
१) शिखर धवन आणि रोहित शर्मा (Shikhar Dhawan and Rohit Sharma)
भारतीय संघातील हिटमॅन म्हणून ओळखला जाणारा रोहित शर्मा आणि गब्बर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिखर धवनने अनेकदा चांगली सुरुवात करून दिली आहे. दोघांनी मिळून भारतीय संघासाठी ५००० धावांपेक्षा अधिकची भागीदारी केली आहे. नुकताच रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी मिळून ११४ धावांची भागीदारी करत भारतीय संघाला जोरदार विजय मिळवून दिला होता. दोघांनी आतापर्यंत ५२३९ धावा जोडल्या आहेत.
२) ॲडम गिलख्रिस्ट आणि मॅथ्यू हेडन (Adam Gilchrist and Matthew hayden)
ॲडम गिलख्रिस्ट आणि मॅथ्यू हेडन ही जोडी मैदानात आली की, विरोधी संघातील गोलंदाज थर थर कापायचे. कारण दोन्ही बाजूंनी गोलंदाजांची चांगलीच धुलाई व्हायची. मॅथ्यू हेडन मुंगूस बॅटने लांब लांब षटकार मारायचा. तर गिलख्रिस्ट मैदानाच्या चारही बाजूला फटकेबाजी करायचा. दोघांनी मिळून अनेकदा ऑस्ट्रेलिया संघाला चांगली सुरुवात करून दिली आहे. दोघांनी मिळून ५३७२ धावा जोडल्या आहेत.
३) सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली ( Sachin Tendulkar and sourav Ganguly)
सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांनी देखील भारतीय संघासाठी अनेकदा महत्वपूर्ण खेळी केली आहे. क्रिकेटच्या मैदानावर सचिनला देव तर सौरव गांगुलीला दादा असे म्हणतात. सध्या सौरव गांगुली बीसीसीआय अध्यक्षांची जबाबदारी पार पाडतोय. दोघांनी मिळून भारतीय संघासाठी ६६०९ धावांची भागीदारी केली आहे.
काय वाटतं सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुलीचा विक्रम रोहित शर्मा आणि शिखर धवन यांची जोडी तोडू शकेल का?? कमेंट करून नक्की कळवा..




