आयपीएल स्पर्धेत या फलंदाजांनी पाडला आहे षटकारांचा पाऊस; यादीत केवळ २ भारतीय...

आयपीएल स्पर्धेत या फलंदाजांनी पाडला आहे षटकारांचा पाऊस; यादीत केवळ २ भारतीय...

आयपीएल स्पर्धा ही जगातील सर्वात मोठी लीग स्पर्धा आहे. या स्पर्धेत जगभरातील अनेक दिग्गज खेळाडू सहभाग घेत असतात. तसेच युवा खेळाडूंना देखील दिग्गजांच्या मार्गदर्शनाखाली खेळण्याची संधी मिळत असते. तसेच टी -२० म्हटलं तर, चौकार आणि षटकारांचा पाऊस पडणं साहजिक आहे. आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांबद्दल माहिती देणार आहोत.

कायरन पोलार्ड

षटकारांबद्दल बोलणार आणि कायरन पोलार्डचा उल्लेख नाही असं होईल का. षटकार मारण्याच्या बाबतीत कायरन पोलार्ड हा पाचव्या स्थानी आहे. गोलंदाज कोणीही असो, षटकार मारून चेंडू मैदानाच्या बाहेर कसा पाठवायचा हे या फलंदाजाला चांगलच माहीत आहे. सध्या त्याने आयपीएल स्पर्धेतून निवृत्ती जाहीर केली आहे. या स्पर्धेत त्याने एकूण १८९ सामन्यांमध्ये २२३ षटकार मारले आहेत.

एमएस धोनी :

हेलिकॉप्टर शॉट साठी प्रसिद्ध असलेला एमएस धोनी षटकार मारण्याच्या बाबतीत देखील पुढे आहे. धोनीने आतापर्यंत २३४ सामन्यांमध्ये २२९ षटकार मारले आहेत. तर फलंदाजी करताना त्याने २३४ सामन्यांमध्ये २९७९ धावा केल्या आहेत. इतकेच नव्हे तर धोनीच्या नेतृत्वाखाली खेळताना चेन्नई सुपर किंग्ज संघाने ४ वेळेस जेतेपदाला गवसणी घातली आहे.

रोहित शर्मा :

मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्माचा देखील सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत समावेश आहे. हिटमॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या फलंदाजाने एकूण २४० षटकार मारले आहेत. त्याने २२८ सामन्यांमध्ये १ शतक आणि ४० अर्धशतकांसह ५८७९ धावा केल्या आहेत.

एबी डीव्हीलियर्स:

मैदानाच्या चारही बाजूंना षटकार मरणाऱ्यासाठी जर कुठला फलंदाज प्रसिद्ध असेल तर, तो नक्कीच एबी डीव्हीलियर्स असेल. वनडेमध्ये सर्वात जलद शतक झळकावण्याचा विक्रम करणाऱ्या एबी डीव्हीलियर्सने आयपीएल स्पर्धेत देखील अनेकदा तुफानी खेळी केली आहे. त्याने आयपीएल स्पर्धेतील १८४ सामन्यांमध्ये एकूण २५१ षटकार मारले आहेत. यादरम्यान त्याने ३ शतके आणि ४० अर्धशतके झळकावली आहेत. तसेच त्याने या सामन्यांमध्ये एकूण ५१६२ धावा केल्या आहेत.

ख्रिस गेल:

ख्रिस गेलला युनिव्हर्स बॉस का म्हणतात, हे तो आपल्या फलंदाजीतून नेहमीच दाखवून देत असतो. ख्रिस गेल जेव्हा फलंदाजीसाठी येतो त्यावेळी गोलंदाज थर थर कापतात, कारण षटकार मारणं ही या खेळाडूची ओळख आहे. त्याने आयपीएल स्पर्धेतील १४२ सामन्यांमध्ये ३५७ षटकार मारले आहेत. यादरम्यान ६ शतके आणि ३१ अर्धशतके झळकावली आहेत. 

काय वाटतं? कुठला असा फलंदाज आहे जो आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत ख्रिस गेलला मागे टाकू शकतो? कमेंट करून नक्की कळवा.

टॅग्स:

IPL

संबंधित लेख