आयपीएल स्पर्धेतून अचानक गायब झालेले खेळाडू! एकाने तर केकेआरला बनवले होते चॅम्पियन...

आयपीएल स्पर्धेतून अचानक गायब झालेले खेळाडू! एकाने तर केकेआरला बनवले होते चॅम्पियन...

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज संघानंतर कोलकाता नाईट रायडर्स हा तिसरा यशस्वी संघ आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाने २०१२ आणि २०१४ मध्ये जेतेपदावर नाव कोरले होते. कोलकाता नाईट रायडर्स संघाला विजय मिळवून देण्यात यष्टिरक्षक फलंदाज मनविंदर बिस्लाने (Manvinder bisla) मोलाची भूमिका बजावली होती. मात्र हा खेळाडू अचानक कुठे गायब झाला? असा प्रश्न तुम्हालाही नक्कीच पडला असेल. आयपीएल २०१२ स्पर्धेतील अंतिम सामन्यात जर मनविंदर बिस्लाने खेळपट्टीवर टिकून महत्वपूर्ण खेळी केली नसती तर, कोलकाता नाईट रायडर्स आयपीएल चॅम्पियन बनू शकला नसता.

आयपीएल २०१२ स्पर्धेतील अंतिम सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही संघांमध्ये पार पडला होता. अंतिम सामन्यात मनविंदर बिस्लाने अवघ्या ४८ चेंडूंमध्ये ८९ धावांची खेळी केली होती. या खेळीच्या जोरावर त्याला सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. मात्र पुढील हंगामात तो चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरला. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्स संघाने त्याला रिलीज केले होते. त्यानंतर २०१५ मध्ये त्याला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने आपल्या संघात स्थान दिले. मात्र त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. तो सध्या प्रशिक्षकाची भूमिका पार पाडतोय.तसेच अनेकदा तो समालोचन करताना देखील दिसून आला आहे. 

मनविंदर बिस्ला सह आणखी काही खेळाडू आहेत, जे चांगली कामगिरी केल्यानंतर अचानक गायब झाले. बोभाटाच्या या लेखात आम्ही तुम्हाला अशाच काही खेळाडूंबद्दल माहिती देणार आहोत.

पॉल वल्थाटी

नाव परदेशी खेळाडूसारखं असलं तरी हा भारतीय खेळाडू आहे. २०११ मध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाविरुद्ध जोरदार शतक झळकावत हा खेळाडू चर्चेत आला होता. २०१२ पर्यंत पॉल वल्थाटी हा किंग्ज इलेव्हन पंजाब संघासाठी महत्वाचा खेळाडू होता. या खेळाडूने एकाच डावात ४ गडी बाद करण्याचा आणि अर्धशतक झळकावण्याचा पराक्रम केला होता. मात्र २०१२ नंतर कुठल्याही संघाने या खेळाडूला आपल्या संघात स्थान देण्यात रस दाखवला नाही. 

डग बॉलिंजर:

 ऑस्ट्रेलिया संघाचा डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज डग बॉलिंजर याने २०१० ते २०१२ दरम्यान चेन्नई सुपर किंग्ज संघाचे प्रतिनिधित्व केले. त्याने चेन्नई सुपर किंग्ज संघाला २ वेळेस जेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. आपल्या आयपीएल कारकिर्दीतील २७ सामन्यांमध्ये त्याने ३७ गडी बाद केले. मुख्य बाब म्हणजे चांगली कामगिरी करून देखील त्याला पुढे आयपीएल स्पर्धा खेळण्याची संधी मिळाली नाही.

राहुल शर्मा :

पुणे वॉरियर्स इंडिया संघाचे प्रतिनिधित्व करताना राहुल शर्माने १४ सामन्यांमध्ये १६ गडी बाद केले होते. त्याने २०११ मध्ये आयपीएल स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली होती. याच कामगिरीच्या बळावर त्याला भारतीय संघासाठी खेळण्याची संधी मिळाली होती. त्याला भारतीय संघासाठी ४ वनडे आणि २ टी -२० सामने खेळण्याची संधी मिळाली. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर तो चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरला. हेच कारण होते की, तो आयपीएल स्पर्धेतून देखील बाहेर झाला.

टॅग्स:

IPL

संबंधित लेख