यावर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टी -२० क्रिकेटचा बोलबाला पाहायला मिळाला. इंग्लंड संघाने दुसऱ्यांदा टी -२० विश्वचषकावर नाव कोरले. तसेच अनेक रोमांचक सामने देखील पाहायला मिळाले. ज्यामध्ये सूर्यकुमार यादव, विराट कोहली आणि मोहम्मद रिजवान सारख्या फलंदाजांनी जोरदार कामगिरी केली. चला तर पाहूया यावर्षी टी -२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांची यादी.
सूर्यकुमार यादव (Suryakumar yadav) :
भारतीय संघातील विस्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सर्वोच्च स्थानी आहे. सूर्यकुमार यादवने यावर्षी ३१ सामन्यांमध्ये ४५.५६ च्या सरासरीने ११६४ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये २ शतके आणि १ अर्धशतकाचा समावेश आहे. सूर्यकुमार यादव हा एकमेव फलंदाज आहे ज्याने टी -२० क्रिकेटमध्ये यावर्षी १००० धावांचा पल्ला गाठला. तसेच यावर्षी सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम देखील सूर्यकुमार यादवच्या नावे आहे.
मोहम्मद रिजवान (Mohammed Rizwan)
पाकिस्तान संघातील अनुभवी यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिजवान या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. तो पाकिस्तान संघाचा सर्वात यशस्वी फलंदाज ठरला. त्याने यावर्षी खेळलेल्या २५ सामन्यांमध्ये ४५.२७ च्या सरासरीने ९९६ धावा केल्या. यादरम्यान त्याने १० अर्धशतके झळकावली.
विराट कोहली (Virat Kohli) :
भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली याने यावर्षी टी -२० क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडला. विराट कोहली गेल्या २ वर्षांपासून शतक झळकावण्यात अपयशी ठरला होता. मात्र यावर्षी त्याने १ शतक आणि ८ अर्धशतके झळकावली. त्याने २० डावांमध्ये ५५.७८ च्या सरासरीने ७८१ धावा केल्या आहेत.
सिकंदर रजा (Sikandar raza) :
झिम्बाब्वे संघातील अष्टपैलू खेळाडू सिकंदर रजा याने आपल्या कामगिरीने सर्वांचेच मन जिंकले आहे. सिकंदर रजाने २३ डावांमध्ये ३४ च्या सरासरीने ७३५ धावा केल्या आहेत. यादरम्यान ८७ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी ठरली.
बाबर आझम (Babar Azam) :
पाकिस्तान संघाचा कर्णधार या यादीत पाचव्या स्थानी आहे. बाबर आझमने यावर्षी खेळलेल्या २६ डावांमध्ये ३१.९६ च्या सरासरीने ७३५ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने १ शतक आणि ५ अर्धशतके झळकावली आहेत. मात्र टी -२० विश्वचषक २०२२ स्पर्धेत त्याला हवी तशी कामगिरी करता आली नाही.
