नागपूर एक्स्प्रेस सुपरफास्ट ! सामनावीर पुरस्कार पटकावताच मोठ्या विक्रमाला घातली गवसणी

नागपूर एक्स्प्रेस सुपरफास्ट ! सामनावीर पुरस्कार पटकावताच मोठ्या विक्रमाला घातली गवसणी

शुक्रवारी( १ एप्रिल ) आयपीएल २०२२ स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पार पडला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाचा वेगवान गोलंदाज उमेश यादव याने अप्रतिम कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले आहे. त्याने या सामन्यात ४ षटक गोलंदाजी केली ज्यामध्ये त्याने २३ धावा खर्च करत ४ गडी बाद केले. याच कामगिरीच्या बळावर पंजाब किंग्ज संघाचा डाव अवघ्या १३७ धावांवर संपुष्टात आला. हा सामना कोलकाता नाईट रायडर्स संघाने ६ गडी राखून आपल्या नावावर केला. दरम्यान उमेश यादवच्या नावे एका खास विक्रमाची नोंद झाली आहे.

उमेश यादवने आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत एकूण १० वेळेस सामनावीर पुरस्कार पटकावला आहे. ज्यामध्ये ६ वेळेस त्याने पंजाब किंग्ज संघाविरुद्ध खेळताना सामनावीर पुरस्कार पटकावला आहे. एकाच संघाविरुद्ध खेळताना सर्वाधिक वेळेस सामनावीर पुरस्कार पटकावणारा तो एकमेव खेळाडू आहे. आयपीएल २०२२ स्पर्धेसाठी झालेल्या लिलावातील पहिल्या टप्प्यात त्याला एकही खरिददार मिळाला नव्हता. त्याची मुली किंमत २ कोटी रुपये होती. शेवटी त्याला कोलकाता नाईट रायडर्स संघाने आपल्या ताफ्यात स्थान दिले.

उमेश यादव नंतर युसुफ पठाण या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. युसुफ पठाणने डेक्कन चार्जर्स संघाविरुद्ध खेळताना ५ वेळेस सामनावीर पुरस्कार पटकावला होता. तर मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मा या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. रोहित शर्माने कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध खेळताना ५ वेळेस सामनावीर पुरस्कार पटकावला होता.