भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एक मोठा ब्रँड बनला आहे. विराट कोहलीने आजच्याच दिवशी (१८ ऑगस्ट) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करून त्याला १४ वर्षे पूर्ण झाली आहेत. क्रिकेटचे मैदान असो किंवा जाहिरात क्षेत्र, विराट कोहलीचा सर्वच ठिकाणी डंका वाजतोय. तो किती लोकप्रिय आहे याचा अंदाज आपण त्याच्या सोशल मीडियावर असलेल्या फॉलोवर्स वरून लावू शकतो. इंस्टाग्रामवर त्याचे २०० मिलियनपेक्षा अधिक फॉलोवर्स आहेत. या १४ वर्षांचा प्रवासात त्याला अनेक अडचणींचा सामना देखील करावा लागला आहे.
सध्या मुंबईत राहत असलेल्या विराट कोहलीचा जन्म ५ नोव्हेंबर १९८८ रोजी दिल्लीमध्ये झाला होता. त्याला लहानपणापासूनच क्रिकेट खेळायची खूप आवड होती. त्यामुळे वयाच्या ८ व्या वर्षी त्याचा क्रिकेटचा प्रवास सुरू झाला. २००७ मध्ये त्याला भारतीय १९ वर्षाखालील संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. या संधीचा पुरेपूर फायदा घेत, त्याने भारतीय १९ वर्षाखालील संघाला १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत (icc under -19 world cup ) स्पर्धेत विजय मिळवून दिला होता.
या स्पर्धेत जोरदार कामगिरी केल्यानंतर १८ ऑगस्ट, २००८ रोजी त्याला भारतीय संघात पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. श्रीलंकेविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेत त्याला ही सुवर्णसंधी मिळाली होती. त्यानंतर त्याने जे काही केलं, ते सर्वांनाच माहीत आहे. रन मशीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विराट कोहलीने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत.
धावांचा पाठलाग करायचा असेल किंवा मोठी धावसंख्या उभारायची असेल, विराट कोहलीला दोन्ही गोष्टी खूप चांगल्या जमतात. एकेरी,दुहेरी धावा घेत धावा कशा गोळा करायच्या हे त्याला चांगलच माहीत आहे. हेच कारण आहे की विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वधिक शतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सचिन तेंडुलकर नंतर दुसऱ्या स्थानी आहे. विराट कोहलीने आतापर्यंत ७० शतके झळकावली आहेत.
विराट कोहलीची वनडे कारकीर्द..
सामने - २६२
एकूण धावा - १२३४४
शतके - ४३
अर्धशतके - ६४
सर्वोच्च धावसंख्या - १८३
विराट कोहलीच्या एकूण क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने तीनही फॉरमॅटमध्ये मिळून ४६३ सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने २३,७२६ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ७० शतके आणि १२२ अर्धशतके झळकावली आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १४ वर्षे पूर्ण झाल्यानंतर सचिन आणि विराटची कामगिरी..
सचिन तेंडुलकर बद्दल बोलायचं झालं तर, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १४ वर्षे पूर्ण झाल्यानंतर सचिन तेंडुलकरने २१५७६ धावा केल्या होत्या. तर विराट कोहलीने २३७२६ धावा केल्या आहेत. यामध्ये टी -२० क्रिकेटमधील ३३०८ धावांचा समावेश आहे. त्यामुळे टी -२० क्रिकेटमधील धावा काढून घेतल्या तर, विराट कोहलीने वनडे आणि कसोटी क्रिकेटमध्ये मिळून २०४१८ धावा केल्या आहेत. त्यामुळे विराट कोहली सचिन तेंडुलकर पेक्षा ११५८ धावांनी पिछाडीवर आहे.
विराट कोहलीच्या क्रिकेट कारकिर्दीत देखील अनेक उतार चढाव आले आहेत. विराट कोहलीने २०११ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले होते. त्याने अंतिम सामन्यात देखील महत्वपूर्ण खेळी केली होती. त्यानंतर वनडे,टी -२० आणि कसोटी क्रिकेटमध्ये विराट कोहलीचा दबदबा सुरू झाला. २० जून २०११ रोजी त्याने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. गेली १४ वर्ष तो टॉप ऑर्डरमधील मुख्य फलंदाज आहे. इतकेच नव्हे तर त्याने कर्णधार म्हणून देखील भारतीय संघासाठी मोलाची भूमिका बजावली आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने इंग्लंड,दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन विजय मिळवला. मात्र २०१९ नंतर त्याला चांगली कामगिरी करता आली नाहीये. त्याला एकही शतक झळकावता आले नाहीये. मात्र आगामी आशिया चषक आणि आयसीसी टी -२० विश्वचषक स्पर्धेत त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
