ऑस्ट्रेलियन अंपायरने घेतली होती मुथय्या मुरलीधरनची कारकीर्द संपवण्याची सुपारी ??? अर्जुन रणतुंगाने केला होता बचाव

ऑस्ट्रेलियन अंपायरने घेतली होती मुथय्या मुरलीधरनची कारकीर्द संपवण्याची सुपारी ??? अर्जुन रणतुंगाने केला होता बचाव

क्रिकेट आणि वाद या दोघांचही खूप जुनं नातं आहे. हाय व्होल्टेज सामन्यात वाद होणं खूप साहजिक गोष्ट असते. जसं नाण्याला दोन बाजू असतात तसच काहीसं क्रिकेटच देखील आहे. क्रिकेटमध्ये चौकार, षटकार, विजय आणि पराभवासह वाद झाल्याचे देखील अनेकदा पाहायला मिळाले आहे. परंतु पंचांमुळे कर्णधाराने आपला संघ मैदानाबाहेर घेऊन गेल्याचे तुम्ही कधी पाहिले आहे का? असाच काहीसा किस्सा १९९९ मध्ये घडला होता. जो किस्सा संपूर्ण क्रिकेट विश्वात चर्चेचा विषय ठरला होता. 

श्रीलंका संघ १९९९ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होता. कसोटी मालिका झाल्यानंतर, दिग्गज खेळाडूंची खाण असलेले हे दोन्ही संघ इंग्लंड संघासोबत त्रिकोनिय मालिकेत सहभाग घेणार होते. ओव्हलच्या मैदानावर इंग्लंड आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना सुरू होता. त्यावेळी कर्णधार अर्जुन रणतुंगाने चेंडू दिला युवा फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनच्या हाती. तो अचुक टप्प्यावर गोलंदाजी करत होता. त्यानंतर १८ वे षटक टाकण्यासाठी पुन्हा एकदा मुथय्या मुरलीधरन गोलंदाजीला आला. या षटकातील पाचवा चेंडू टाकताच पंचांनी तो नो चेंडू घोषित केला. मुरलीधरनला वाटले की, त्याचा पाय रेषेच्या पुढे गेला असावा म्हणूनच पंचांनी नो चेंडू घोषित केला. परंतु कारण काहीतरी वेगळेच होते.

पंचांच्या त्या निर्णयामुळे पेटला नवा वाद

मुथय्या मुरलीधरनने (Muttiah Muralitharan) जाब विचारताच पंच रॉस इमरसेनने (Ross Emerson) म्हटले की, "तू इल्लिगल ॲक्शनने गोलंदाजी करत आहेस." पंचांच्या या निर्णयामुळे रणतुंगा भलताच नाराज झाला. त्याने आपल्या संपूर्ण संघाला खेळपट्टीजवळ बोलावून पंचांसमोर आपली बाजू मांडण्यास सुरुवात केली. रणतुंगाने सांगितले की, मुरलीधरनची ॲक्शन परिपूर्ण आहे आणि त्याला आयसीसीकडून क्लीन चिट देखील मिळाली आहे. 

हा तर क्लायमॅक्स होता. खरा चित्रपट तर ५ जानेवारी रोजीच सुरू झाला होता. ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका संघ कसोटी मालिकेसाठी आमने सामने होते. या सामन्यात मुथय्या मुरलीधरनने टाकलेला चेंडू, तीन वेळेस नो चेंडू म्हणून घोषित करण्यात आला होता. जाब विचारला असता त्यावेळी देखील रॉस इमरसेनने मुथय्या मुरलीधरनच्या गोलंदाजी ॲक्शनवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या सामन्याच्या दहा दिवसांपूर्वी झालेल्या सामन्यात डॅरेल हेयरने देखील मुथय्या मुरलीधरनच्या गोलंदाजी ॲक्शनवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर १९९६ विश्वचषक स्पर्धेपूर्वी हाँगकाँग युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये त्याच्या गोलंदाजी ॲक्शनची चाचणी घेण्यात आली, ज्यामध्ये त्याला क्लीन चिट मिळाली होती. 

क्लीन चीट मिळाल्यानंतर देखील रॉस इमरसेनने मुथय्या मुरलीधरनच्या गोलंदाजी ॲक्शनवर प्रश्न उपस्थित केले, हे पाहून अर्जुन रणतुंगा भलताच तापला होता. आपला संपूर्ण संघ घेऊन तो सीमारेषेजवळ जाऊन उभा राहिला होता. रॉस इमरसेन मुथय्या मुरलीधरनच्या विरोधात होते. परंतु अर्जुन रणतुंगा (Arjun ranatunga) एकटाच निडर होऊन आपल्या युवा गोलंदाजाचे समर्थन करत होता. सामना खूप वेळ थांबला होता. अर्जुन रणतुंगा हा सामना घोषित करण्याच्या तयारीत होता. इतक्यात श्रीलंका क्रिकेट बोर्डने मध्यस्ती केली आणि सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात झाली. 

या रोमांचक सामन्यात श्रीलंका संघाने एक गडी राखून जोरदार विजय मिळवला होता. परंतु या सामन्यानंतर, पंचांसोबत केलेल्या कृत्यामुळे अर्जुन रणतुंगाला एक सामना न खेळण्याची शिक्षा सुनावण्यात आली होती. तसेच मुथय्या मुरलीधरनला गोलंदाजी ॲक्शनची चाचणी करण्यासाठी पर्थला पाठवण्यात आले होते. मुथय्या मुरलीधरनच्या कठीण काळात अर्जुन रणतुंगाने मोलाची साथ दिली. एकेकाळी त्याच्या गोलंदाजी ॲक्शनवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले होते. सध्या कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावे ८०० गडी बाद करण्याची नोंद आहे. असा पराक्रम करणारा तो एकमेव गोलंदाज आहे. तर वनडे क्रिकेटमध्ये त्याने ५३४ गडी बाद केले आहेत.