वाचा भारतात जन्मूनही दुसऱ्याच देशांसाठी क्रिकेट खेळणाऱ्या ९ खेळाडूंबद्दल !!

लिस्टिकल
वाचा भारतात जन्मूनही दुसऱ्याच देशांसाठी क्रिकेट खेळणाऱ्या ९ खेळाडूंबद्दल !!

असे अनेक क्रिकेटर्स आहेत ज्यांनी आपल्या जन्मभूमीसाठी न खेळता दुसऱ्या देशासाठी खेळणं पसंत केलं. त्यापाठी अनेक कारणं होती. जगभरात असे अनेक खेळाडू होऊन गेले, यापैकी काही भारतातदेखील होते. भारताबद्दल बोलायला गेलं तर भारतात जन्मलेल्या ९ उत्तम क्रिकेटपटूंनी इंग्लंड आणि चक्क पाकिस्तानच्या टीममध्ये सामील होऊन आपलं करियर घडवलं.

आज बघूत ते कोणते ९ क्रिकेटर होते ज्यांचा जन्म तर भारतात झाला, पण ते खेळले दुसऱ्या देशासाठी...

१. नासीर हुसैन – इंग्लंड

१. नासीर हुसैन – इंग्लंड

नसीर हुसैन हे इंग्लंड क्रिकेट टीमचे कॅप्टन होते. त्यांचा जन्म मद्रास येथे २८ मार्च १९६८ साली झाला. त्यांचे वडील जावेद हे भारतीय होते, तर त्यांची आई ब्रिटीश होती. वडील स्वतः क्रिकेटर असल्याने क्रिकेट आणि त्यांची ओळख फार लवकर झाली.

१९७५ साली नासीर हुसैनचा परिवार इंग्लंडला स्थाईक झाला. त्यानंतर त्यांचं शिक्षण इंग्लंडमध्येच पार पडलं. यादरम्यान त्यांनी शालेय क्रिकेट स्पर्धांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली होती. पुढे १९९० साली त्यांनी इंग्लंडच्या टीममध्ये पदार्पण केलं आणि त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीकडे बघता, त्यांना सर्वात यशस्वी कॅप्टन मानलं जातं.

२. माजीद खान – पाकिस्तान

२. माजीद खान – पाकिस्तान

माजीद खान यांचे वडील जहांगीर खान हे स्वातंत्र्यपूर्व काळातील ‘ब्रिटीश इंडियन टीम’ मध्ये खेळत होते. फाळणी झाल्यांनतर ते पाकिस्तानात गेले. फाळणी आधीच म्हणजे १९४६ साली माजीद खान यांचा जन्म लुधियाना येथे झाला होता. वडिलांकडून आलेला वारसा सांभाळत त्यांनी क्रिकेटमध्ये यशस्वी करियर केलं. त्यांनी न्यूझीलंड विरुद्ध १९७६ साली गाजवलेला सामना विशेष लक्षात राहिला. 


 

३. हनीफ मोहम्मद - पाकिस्तान

३. हनीफ मोहम्मद - पाकिस्तान

हनीफ मोहम्मद यांना पाकिस्तानचा पहिला ‘स्टार क्रिकेटर म्हणून ओळखलं जातं. त्यांचा जन्म गुजरातमधल्या जुनागढ येथे २१ डिसेंबर, १९३४ साली झाला होता. वेस्ट इंडीजविरुद्ध त्यांनी केलेल्या ३३७ धावांनी त्यांना प्रसिद्धी मिळवून दिली. त्यानंतर त्यांनी चक्क ४९९ धावांचं रेकॉर्ड केेलं.

हनीफ मोहम्मद यांचे भाऊ सादिक, मुश्ताक आणि वझीर हे देखील पाकिस्तान टीमसाठी खेळले. या तिघांचा जन्म देखील जुनागढचाच होता.

४. रॉबिन जॅकमन – इंग्लंड

४. रॉबिन जॅकमन – इंग्लंड

रॉबिन यांचा जन्म शिमल्यात झाला. यांचे वडील इंग्रजांच्या सेवेत असताना त्यांची पोस्टिंग शिमलामध्ये झाली होती. १९४५ साली रॉबिन यांच्या जन्मानंतर एक वर्षाने त्यांच्या वडिलांना युद्धात एक पाय गमावावा लागला. त्यामुळे त्याच्या कुटुंबाने पुन्हा इंग्लंड गाठले आणि त्याचं पुढचं आयुष्य इंग्लंडमध्येच गेलं. तिथेच त्यांची ओळख क्रिकेटशी झाली. वयाच्या ३५ व्या वर्षी त्यांनी इंग्लंड क्रिकेट टीममध्ये पदार्पण केलं. क्रिकेटर म्हणून त्यांची ओळख तर आहेच, पण कॉमेंटरीसाठी ते जास्त प्रसिद्ध झाले.

५. असिफ इक्बाल – पाकिस्तान

५. असिफ इक्बाल – पाकिस्तान

पाकिस्तानचे ऑलराउंडर असिफ इक्बाल यांचा जन्म (१९४३) हैद्राबादचा. त्यांनी काही वर्ष हैद्राबाद क्रिकेट टीमसाठी सामने खेळले होते. १९६१ साली त्यांचा परिवार पाकिस्तानात स्थाईक झाल्यानंतर त्यांनी पाकिस्तान क्रिकेट टीममध्ये प्रवेश घेतला. १९७५ च्या वर्ल्डकपमध्ये ते पाकिस्तानच्या बाजूने खेळले होते.
 

६. बॉब वूल्मर – इंग्लंड

६. बॉब वूल्मर – इंग्लंड

१४ मे १९४८ साली कानपूरमध्ये जन्मलेले बॉब वूल्मर हे कोच म्हणून जास्त ओळखले जातात. साऊथ आफ्रिका तसेच पाकिस्तानचे ते कोच होते. त्यांनी कोच होण्याआधी इंग्लंड क्रिकेट टीमसाठी बरीच वर्ष काम केलं. त्यांचे वडील देखील क्रिकेटर होते. ते ब्रिटीश काळातील उत्तर प्रदेशच्या टीमसाठी खेळले होते.
 

७. के. एस. रणजितसिंहजी - इंग्लंड

७. के. एस. रणजितसिंहजी - इंग्लंड

रणजी क्रिकेट स्पर्धेला ज्याचं नाव देण्यात आलं ते रणजितसिंहजी इंग्लंडच्या टीमसाठी खेळले होते. १० सप्टेंबर १८७२ साली त्याचं जन्म झाला होता. ते मुळात ब्रिटीश काळातील काठीयावाडचे संस्थानिक होते. राजे असले तरी त्यांना टेनिस आणि क्रिकेटमध्ये रस होता पण टेनिसपेक्षा त्यांनी क्रिकेटला जास्त प्राधान्य दिलं.

इंग्लंडच्या टीमसाठी त्यांनी १८९६ साली पहिल्यांदा टेस्ट मॅच खेळली. त्या काळातील सर्वोत्तम क्रिकेटर म्हणून त्यांना ओळखलं जायचं. पुढे जाऊन त्यांच्या स्मरणार्थ रणजी सामन्यांची सुरुवात करण्यात आली.

८. डगलस जॅरडिन - इंग्लंड

८. डगलस जॅरडिन - इंग्लंड

डगलस यांचा जन्म मुंबईचा. २३ ऑक्टोबर १९०० साली त्यांचा जन्म झाला. वयाच्या ९ व्या वर्षी त्यांना स्कॉटलंडमध्ये त्यांच्या आईच्या कुटुंबीयांकडे कायमचं जावं लागलं. त्यांचं पुढील आयुष्य तिथेच गेलं आणि तिथेच त्यांनी क्रिकेटमध्ये रस दाखवला. शालेय पातळीवर खेळत ते पुढे इंग्लंडचे कॅप्टन देखील झाले. त्यांनी कॅप्टन म्हणून यशस्वीरीत्या काम पार पाडलं.
 

९. कॉलीन कॉड्रे - इंग्लंड

९. कॉलीन कॉड्रे - इंग्लंड

कॉलीन हे पहिले असे क्रिकेटर आहेत ज्यांनी तब्बल १०० पेक्षा जास्त टेस्ट मॅचेस खेळल्या. त्यांचा जन्म भारतात ‘उटी’ येथे झाला होता. वयाच्या पाचव्या वर्षी ते इंग्लंडला गेले. इंग्लंडमध्येच त्यांनी क्रिकेटचे धडे घेतले. टेस्ट मॅचमध्ये नाव झाल्यानंतर त्यांनी एक वनडे मॅचसुद्धा खेळली होती. १९७५ साली ते रिटायर झाले आणि त्यानंतर त्यांनी काही वर्ष ‘इंटरनॅशनल क्रिकेट कउन्सिल’चं अध्यक्षपद देखील सांभाळलं.

आहे ना गंमत ? जन्मभूमी एक, तर कर्मभूमी दुसरीच !!

टॅग्स:

cricket

संबंधित लेख