घरकाम करणाऱ्या बाई ते स्टँडअप कॉमेडियन....मराठमोळ्या दीपिका म्हात्रे यांचा प्रेरणादायी प्रवास !!

घरकाम करणाऱ्या बाई ते स्टँडअप कॉमेडियन....मराठमोळ्या दीपिका म्हात्रे यांचा प्रेरणादायी प्रवास !!

सध्या स्टँडअप कॉमेडी शोजची संख्या वाढली आहे. पूर्वी झी मराठीवर हास्यसम्राट कार्यक्रम आला होता किंवा ‘ग्रेट इंडियन लाफ्टर शो’ सारखा शो होता. अशा शोज मधूनच स्टँडअप कॉमेडी दिसून यायची पण आजच्या काळात युट्युबने एक मोठं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आहे. या संधीमुळेच अनेकजण आपल्यातली कला सादर करू शकत आहेत.

मंडळी, नव्या स्टँडअप कॉमेडीयन्सच्या फळीतील एक नाव सध्या प्रचंड चर्चेत आहे. ही व्यक्ती आपण टीव्हीवर बघतो तशी शिकलीसवरलेली कॉमेडीयन नाही. तर त्या अगदी आपल्यातल्याच एक आहेत. त्याचं नाव आहे दीपिका म्हात्रे.

स्रोत

त्यांचा व्यवसाय काय आहे हे आधी सांगतो. सकाळी रेल्वे मध्ये ज्वेलरी विकणे, दुपारी स्वयंपाकी आणि रात्री कॉमेडीयन. मंडळी, दीपिका म्हात्रे या मोलकरीण म्हणून काम करतात. त्यांच्या पतीला अस्थमा असल्याने त्यांनी काम सोडलेलं आहे. घरात ३ मुली आहेत. त्यातील २ जणी शिकत आहेत. एकंदरीत घराची सर्व जबाबदारी त्यांच्यावर आहे. एवढ्या जबाबदाऱ्या आणि दिवसाचं काम बघता त्या कॉमेडीयन कशा झाल्या असा प्रश्न पडला असेल ना ? चला वाचूया त्यांची कहाणी.

दीपिका ताई या संगीता व्यास यांच्याकडे काम करायच्या. एकदा संगीता व्यास यांनी त्यांच्या भागातील सर्व घरकाम करणाऱ्या बायकांसाठी एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात प्रत्येकीला सर्वांसमोर काहीना काही सादर करायचं होतं. मग काहींनी नृत्य केलं तर काहींनी गाणी म्हटली. दीपिका ताईंनी मात्र माईक हातात घेऊन सगळ्यांना हसवलं. त्यांचे विनोद देखील रोजच्या जगण्यातले होते. हलक्या फुलक्या पद्धतीने त्यांनी बसलेल्या सर्वांच मन जिंकलं. या कार्यक्रमामुळे त्यांना त्यांच्या छुप्या गुणाचा शोध लागला.

स्रोत

या कार्यक्रमात हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टर रचेल लोपेझ आल्या होत्या. त्यांना दीपिका ताईंच सादरीकरण आवडलं. दीपिका ताईंनी आपल्या कलेला व्यावसायिक मंचावर सादर करावं असं रचेल यांनी सुचवलं. लवकरच त्यांनी दीपिका ताई आणि कॉमेडीयन अदिती मित्तल यांची ओळख करून दिली आणि अशा प्रकारे दीपिका ताईंचा नवीन प्रवास सुरु झाला. 

अदिती मित्तल समवेत त्यांनी आपला पहिला कार्यक्रम पार पाडला. त्याचं नाव होतं ‘Bad Girls’.

स्रोत

त्यांनी अनेक वर्ष इतरांच्या घरी काम करून घर चालवलं आहे. त्यांच्या कामामुळे आलेले बरे वाईट प्रसंग त्या विनोदी ढंगाने मांडतात. त्यांच्या कॉमेडीतील अस्सलपणा इथूनच आला आहे. आजही घरकाम करणाऱ्या बाईंसोबत लोकांची कशी वागणूक असते हेही त्या समोर आणत आहेत.

दीपिका ताईंच्या कुटुंबाने त्यांच्या या नव्या कामाला विरोध केला होता. पण आज त्यांना दीपिका ताईंचा अभिमान वाटत आहे. इतरांचाही त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदललेला दिसतोय. लोक त्यांन भेटून त्यांचं कौतुक करतात, त्यांच्या सोबत सेल्फी घेतात. एवढंच नाही तर त्यांच्या बद्दल बातम्या छापून येत आहेत. 

स्रोत

दीपिका ताईंना ‘हाय ब्लड शुगर’चा त्रास असल्याने त्यांनी आता स्वयंपाकी म्हणून काम करणं बंद केलं आहे. त्यांना हातभार म्हणून त्यांच्या मुलीने नोकरी करण्यास सुरुवात केली आहे. आता त्यांचा पुढचा बेत आहे आणखी कॉमेडी शोज करणं. त्यांना या क्षेत्रात पुढे आणखी काम करायचं आहे. त्या योग्य संधीची वाट बघत आहेत.

मंडळी, आयुष्यात अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं पण त्यातूनही लहानसहान विनोदाचे क्षण शोधून जगणं हे दीपिका ताईंकडून शिकायला मिळतं. 

टॅग्स:

Bobhatamarathimarathi newsbobhata newsbobhata marathimarathi infotainment

संबंधित लेख