आजपर्यंत तुम्ही पुरातन उत्खननात मानवी सांगाडे, नाणी, जुन्या घरांचे सांगाडे, वस्तू, भांडी या गोष्टी सापडल्याचे ऐकले असेल. ४००० वर्षांपूर्वीचा खाण्याचा पदार्थ सापडलाय असे कोणी सांगितले तर नक्कीच तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण हे चक्क घडले आहे. नुकतेच हडप्पा काळातले लाडू सापडले आहेत आणि तेही आजच्या भाषेत सांगायचं झालं तर 'हाय प्रोटीन' आणि 'मल्टिग्रेन'. काय आहे हे संशोधन आज पाहुयात.
४००० वर्षांपूर्वीचे लाडू सापडलेत? त्या काळात लाडू का आणि कसे तयार करायचे?


राजस्थानमध्ये उत्खननात काही हडप्पा संस्कृतीतल्या वस्तू सापडल्या होत्या. त्या सापडलेल्या वस्तूंचा अभ्यास केल्यानंतर हे ४००० वर्षांपूर्वीच्या लोकांनी बनवलेले मल्टीग्रेन ‘लाडू’ असल्याचं सिद्ध झालं आहे. बीरबल साहनी इन्स्टिट्यूट ऑफ पॅलेओसियन्स (बीएसआयपी), लखनऊ (लखनऊ) आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय), नवी दिल्ली यांनी हा अभ्यास केला आहे. हे लाडू तृणधान्ये व डाळींनी बनवलेले आहेत. या संशोधनाचा अहवाल नुकताच एल्सेव्हियरच्या 'जर्नल ऑफ पुरातत्व विज्ञान' (Journal of Archaeological Science) मध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.
२०१४ ते २०१७ मध्ये पश्चिम राजस्थानमधील बिनजोर (पाकिस्तान सीमेजवळ) येथील उत्खननाच्या वेळी असे सात 'लाडू' सापडले होते. हे तपकिरी आणि मोठ्या आकाराचे लाडू आहेत. त्याबरोबरच दोन बैलांची मूर्ती आणि तांब्याची कुऱ्हाडही सापडली आहे. वैज्ञानिकांच्या मतानुसार त्या काळातले लोक शेती करताना काही पूजा करत असावेत व नैवेद्य म्हणून हे लाडू बनवत असावेत.

हे लाडू सुरक्षित राहिल्याचे कारण म्हणजे ते एका बंद पेटीत सापडले. त्यामुळे ते चिरडले किंवा फुटले नाहीत. त्यांचा चिखलाशी संपर्क आला त्यामुळे ते पूर्णपणे कुजले नाहीत. कारण, त्यात वापरलेले धान्य. पाण्याशी संपर्क आल्याने ते थोडे जांभळट झाले होते. एएसआयने वैज्ञानिक विश्लेषणासाठी लाडूंचे नमुने बीएसआयपीकडे दिले होते तेव्हा वैज्ञानिकांना वाटले की ते काही मृत प्राण्यांचा अवशेष असू शकतो. पण त्या एकसारख्या गोल आकारामुळे कुतूहल वाढले आणि ते लाडूच आहेत हे स्पष्ट झाले.
पूर्ण अभ्यासानंतर असे आढळले की हे लाडू बार्ली, गहू, चणे आणि इतर काही तेलबिया यांपासून बनलेले होते. तेव्हा शेती हेच प्रमुख उद्योग असल्याने ऊर्जेसाठी हे लोक प्रथिनयुक्त पदार्थ खात असावेत. मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि पोटॅशियमने युक्त असे हे लाडू पोषण आहार म्हणून खात होते. एक विशिष्ट पूजाविधी मध्ये हे लाडू बनवले जात असावेत. असा निष्कर्ष शास्त्रज्ञ आणि पुरातत्वशास्त्रज्ञांच्या पथकाने काढला आहे.
आज विज्ञानामुळे आपल्याला पदार्थांचे मूल्यमापन करणे शक्य होते. पण ४००० वर्षांपूर्वी बनवलेले हे लाडूही तेव्हाच्या लोकांची जीवनशैली किती वैशिष्ट्यपूर्ण होती हे दर्शवते.
लेखिका: शीतल दरंदळे
टॅग्स:
संबंधित लेख

जेव्हा अनिल कुंबळेने इंग्लिश गोलंदाजांना रडवत इंग्लंडमध्येच झळकावले होते शतक!! वाचा तो किस्सा..
११ ऑगस्ट, २०२२
लिस्टिकलएक मुंबईत आलेला मुलगा ज्याला चेहरा बघून कोणी काम देत नव्हते तो आज स्वतः लोकांना बॉलिवूडमध्ये काम देत आहे.
२८ मे, २०२२
लिस्टिकलया ट्रॅव्हेल फोटोग्राफरने टिपलेला भारत तुम्हीही पाहिला नसेल....पाहा हे १५ फोटो!!
२८ ऑक्टोबर, २०२१
लिस्टिकलखमंग, रवाळ साजूक तूप कसे बनवायचे? तूप कढवायची पद्धत आणि त्यामागील विज्ञान समजून घ्या!!
३० ऑगस्ट, २०२१