आजच्या काळात सोशल मीडिया अनेकांसाठी वरदान ठरलाय. आधी फक्त फेमस होणं ही मूठभर लोकांची मक्तेदारी होती. खेड्यापाड्यात आणि लहान शहरांमध्ये राहणाऱ्यांसाठी टीव्हीवर येणे, प्रसिद्ध होणे म्हणजे स्वप्न असायचे. आता तो जमाना गेला मंडळी!! आता तुमच्यात स्किल असेल तर घरबसल्या फेमस पण होता येते, आणि भरभक्कम कमाई पण करता येते. जसजसा सोशल मीडिया प्रभावी होत आहे, तसतसा टीव्हीचा प्रभाव कमी होत आहे. आधी रिऍलिटी शोजमध्ये मोठ्या शहरातली आणि पैसे बाळगून असणाऱ्यांची मुलंच दिसायची. पुढे जाऊन बॉलीवूडमध्ये करियर करण्याची शक्यता पण त्यांचीच असायची. आपल्या खेड्यापाड्यांतल्या लोकांमध्ये दाबून क्षमता भरलेली असते, पण त्यांना व्यासपीठच मिळत नाही ना राव!!
मागे गल्ली बॉय सिनेमा लोकांनी तुफान डोक्यावर घेतला. कारण पण तसंच होतं, धारावीच्या झोपडपट्टीत राहणारा २२ वर्षाचा मुराद यु ट्युबच्या मदतीने स्वतःच्या स्किलला वाट मोकळी करून देतो आणि भल्या भल्या रॅपर्सची कशी भंबेरी उडवतो. असा तो सिनेमा!! भारतातील लहान शहरात राहणाऱ्या, खेड्यात राहणाऱ्या तरुणांचा मुराद हा प्रतिनिधी आहे. मंडळी, क्षमता आहे पण संधी नाही म्हणण्याचे दिवस आता गेले. तुमच्यात स्किल असेल तर सोशल मीडिया नावाचे जगातील सर्वात मोठे व्यासपीठ तुमच्या हातात आहे. इंटरनेटमुळे विषमता मोडीत निघत आहे. त्याचे अनेक उदाहरणे आता पुढे यायला लागली आहेत.
सध्या खान्देशात असाच एक पठठ्या धुमाकुळ घालतोय. याचे वय माहित आहे? फक्त ८ वर्ष!!




