आपल्या वाचकांपैकी ज्यांनी गेल्या आठवड्यात शेअर बाजारावर नजर ठेवली असेल त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की बाजार दिवसभरात बराच वरखाली होतो आहे. बाजार मिनीटा मिनीटाला वरखाली होतो आहे. सकाळी ७०० पॉइंट वर असेल तर दुपारी २०० पॉइंट खाली घसरलेला असेल. तर बंद होता होता पुन्हा उसळून वर आला असेल. बाजाराच्या भाषेत या हालचालींना 'अनप्रेडीक्टेबली व्होलाटाइल' असे म्हणतात. 'अनप्रेडीक्टेबली व्होलाटाइल' म्हणजे अगदी तज्ञ माणसं पण ज्याच्या हालचालीवर भाष्य करू शकत नाही असे मार्केट !
पण शेअर बाजार नेहेमीच असा असतो का ? - नाही. शेअर बाजार रोजच वरखाली होत असतोच पण दिशाहीन कधीच नसतो. चला आज समजून घेऊ या शेअर बाजार कसा चालतो.

बुल मार्केट - म्हणजे सगळं काही चांगलंच होणार आहे असा मूड असलेला बाजार.
बेअर मार्केट - म्हणजे आता काही खरं नाही असा मूड असलेलं मार्केट.
लिस्टलेस मार्केट म्हणजे - काय कळत नाही बॉ नक्की काय होणार आहे या जगाचं ! असा मूड असलेलेलं मार्केट.
रेंज बाउंड मार्केट - हा सावध पवित्रा असलेला बाजार !
पण ही माहिती अगदी रुक्ष अशा शब्दात झाली.

खर सांगायचं तर हे सगळे मनाचे खेळ असतात. डोळ्यांना दिसणारी, कानावर पडणारी, मेंदूला पेलणारी, मनाशी खेळ करणारी माहीती बाजारातले शेअरचे भाव खालीवर करत असते . मनातल्या भावना आणि विचार यांच्या कुस्तीत जी हारजीत होईल त्यावर खरेदी आणि विक्री अवलंबून असते.
आता तुम्ही म्हणाल फंडामेंटल थिअरी वाले पैलवान - टेक्नीकल थिअरीवाले कविलोक हेच मार्केट ठरवतात. पण वाचकहो ती कोणी काही असू देत आहेत तर माणसंच नाही का ?
चला आमचे हे फंडे आपण आज जरा मनोरंजक पध्दतीने समजून घेऊ या !
कल्पना करा, एका मोठ्या हॉलमध्ये लग्नासाठी योग्य आणि उत्सुक तरुणींचा मेळावा जमला आहे. स्टेजवर मॅरेज काउन्सीलर येऊन मुलाची माहीती देणार आहे. मुलाबद्दल मोजक्या काही विधानात ही माहीती दिली जाणार आहे. जे विधान आवडेल त्या विधानाला संमती देण्यासाठी हात उंचावून होकार द्यायचा आहे. समजा पुढचे विधान नाही आवडले तर हात खाली घेण्याची मुभा आहे.




