'अझहर’चा रिलीज होतोय बायोपिक ; क्रिकेटवर आधारलेले यातले किती सिनेमे तुम्ही पाहिलेत?

लिस्टिकल
'अझहर’चा रिलीज होतोय बायोपिक ; क्रिकेटवर आधारलेले यातले किती सिनेमे  तुम्ही पाहिलेत?

हे वर्ष क्रिकेटविषयीच्या चित्रपटांसाठी खूप महत्वाचं आहे. याच वर्षी क्रिकेटचा देव ’सचिन तेंडुलकर’ आणि कॅप्टन कूल ’महेंद्रसिंग धोनी" यांच्यावर सिनेमे येऊ घातलेयत. आणि याच आठवड्यात अझरूद्दिनवरती असलेला ’अझहर’ हा सिनेमाही रिलीज झाला आहे. 

आपल्या क्रिकेटवेड्या देशात या खेळावरती आधीही पुष्कळ सिनेमे निघाले आहेत. चला घेऊया त्यांचा आढावा. यातले काही सिनेमे पाहायचे तुमचे नक्कीच चुकले असणार.  

अव्वल नंबर -१९९०

अव्वल नंबर -१९९०

कुठेतरी म्हटल्याप्रमाणे आमिर खानने हा सिनेमा कथा न वाचताच साईन केला होता. सिनेमा पाहिला तर हे विधान खरंच पटेल. या सिनेमात देव आनंद बहुधा आर्मी रिटायर्ड कर्नल असतो, मग आता पोलिस कमिशनर असतो, फावल्या वेळात क्रिकेट खेळत असतो आणि त्याला बॉंब निकामी करण्याचं तंत्रही अवगत असतं. हा सिनेमा म्हणजे सबकुछ ’देव आनंद’ होता. 

हिरो म्हणून आमिर खानला थोडे काम होते पण नायिका झालेल्या एकता कपूरला एक-दोन सीन्स वगळता काहीच काम नव्हते. 'पूछो ना कैसा मजा आ रहा है’ हे या सिनेमातलं तेव्हाचं गाजलेलं गाणं. 

चमत्कार -१९९२

चमत्कार -१९९२

हा भुताचा सिनेमा भलताच विनोदी होता.शाहरूखच्या पदार्पणाच्या पहिल्या काही सिनेमांमधला हा सिनेमा. नसीरूद्दिनने साकारलेलं ’मार्को’ भूत, खट्याळ उर्मिला आणि साधा भोळा ’सुंदर श्रीवास्तव’ ही भट्टी मस्त जमून आली होती. या सिनेमाच्या शेवटाकडे एक क्रिकेट मॅच होती. ती आता बाळबोध वाटते पण त्या काळी त्या मॅचनेच खदखदवून हसवलं होतं.

या सिनेमाचं नांव घेताच ’इस प्यार से मेरी तरफ ना देखो’,  हे नटखट गाणं आणि ’ ये है प्यार प्यार’ सारखं शांत रोमॅंटिक गीत  पटकन आठवतात.

 

लगान-२००१

लगान-२००१

आशुतोष गोवारीकर आणि आमीर खानचा हा सिनेमा इतक्यांदा पाहिलाय की यातले संवाद न संवाद तोंडपाठ आहेत. या सिनेमा प्रदर्शित झाला तेव्हा त्याच्या लांबीवर बरेचजणांनी तोंडसुख घेतलं होतं. पण आजही टीव्हीवर लगान लागला की हळूच कधी बूड टेकलं जातं हे कळतही नाही. खरंतर ’लगान’ कुणी विसरूच शकत नाही. कुणीतरी फॉरवर्ड्स मध्ये ’डुगना लग्गान डेना पडेगा’ सारखे संवाद पाठवतं तर कुणी ’I am in love for sure' ची रिंगटोन ठेवतं. 

या सिनेमाच्या शेवटच्या मॅचने ’उम्मीद पे दुनिया कायम है’ शिकवलं. कधी कधी नोबॉल चांगले असतात, पण जेव्हा ते आपल्या विरूद्ध एखाद्या वर्ल्ड कप मध्ये उलटतात तेव्हा हळहळही तितकीच वाटते.

’ओ पालनहारे’,  ’घनन घनन’, ’ओ री छोरी’.. गाजलेल्या गाण्यांची यादी द्यायचीच तर सगळीच गाणी लिहावी लागतील. 

 

स्टंपड-२००३

स्टंपड-२००३

रविना टंडनचा हा सिनेमा तितकासा गाजला नव्हता. एका सोसायटीत राहणार्‍या क्रिकेटवेड्या लोकांवर हा बेतला होता. मात्र युद्धात कर्नल लढायला गेल्यावर सोसायटीतलं वातावरणच बदलतं. संदेश चांगला असला तरी हाताळणीपायी सिनेमा वाया गेला.

इकबाल -२००५

इकबाल -२००५

पुष्कळ दिवस पाठमोरं पोस्टर पाहिल्यानंतर ’अरे, आपला श्रेयस’ अशी प्रतिक्रिया घेत या चित्रपटाचं फायनल पोस्टर प्रदर्शित झालं. प्रतिक्षा लोणकरचं क्रिकेटवेड, गोडुली बहिण आणि आपला नायक ’इकबाल’. आत्मविश्वास आणि आशावादाने भारलेला हा सिनेमा मस्ट वॉच आहे. ’आशाऍं’ गाणं हा या सिनेमाच चर्मबिंदू. 

नुकताच बहिणीची भूमिका केलेल्या श्वेता बसूच्या अटकेच्या वृत्तामुळे ह चित्रपट पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला होता.

जन्नत-२००८

जन्नत-२००८

सिरीयल किसर ’इमरान हाश्मी’ आणि नवोदित तारका सोनल चौहानचा हा सिनेमा. यात सिनेमाच्या शेवटाकडे क्रिकेट मॅच फिक्सिंग आणि बेटिंग दाखवलं आहे. गुन्हा आणि गुन्हेगाराचं उदात्तीकरण न करता हा सिनेमा संपतो. सोनल चौहानचा या इंड्र्स्ट्रीत काही जम बसला नाही. 

’जरासी दिलमें दे जगह तू’ हे गाणं त्यावेळी प्रत्येकाच्या ओठी होते.

दिल बोले हडिप्पा -२००९

दिल बोले हडिप्पा -२००९

२००६ साली प्रदर्शित झालेल्या ’शी एज द मॅन’ या अमेरिकन सिनेमाची भ्रष्ट नक्कल म्हणजे हा सिनेमा. रानी मुखर्जीला मुलगा दाखवायचे की हॉट मुलगी यात दिग्दर्शक गोंधळून गेलाय. बरं ती भारत-पाकिस्तान मॅच, अनुपमचं क्रिकेटप्रेम आणि शाहिद कपूर.. सगळंच काही ओढून ताणून आणलेलं. खरंतर हे कलाकार अतिशय गुणी आहेत, पण असले सिनेमे पाहावत नाहीत.

फेरारी की सवारी-२०१२

फेरारी की सवारी-२०१२

लहानगा कायोमंड, त्याचं क्रिकेटप्रेम आणि प्रेमळ बाबा ही कथा आहे ’फेरारी की सवारी’ची. शर्मन जोशी इतका साधा सज्जन पाहाण्याची आपल्याला सवय नाही. या सिनेमात खरा सचिन नाहीय, पण त्याची फेरारी मात्र खरीखुरी दाखवलीय. आणि मग क्रिकेट टीममध्ये अंतर्भाव होण्यासाठी असणारं राजकारण ही आलंच. 

या सिनेमात माजी क्रिकेटवीराच्या भूमिकेत बोम्मन इराणीने जान ओतलीय.  हा सिनेमा पाहावा तो कायोमंड आणि बोम्मनसाठी. विद्या बालनच्या चाहत्यांसाठी विद्याने केलेला हिंदळलेल्या लावणीवर डान्स हे ही एक आकर्षण आहेच. 

अझहर - २०१६

अझहर - २०१६

मैदानावर कुठूनही स्टंप्सवर डायरेक्ट हिट करू शकणारा आपला माजी कर्णधार मोहम्मद अझरूद्दिन. मॅच संपल्यानंतरचं त्याचं एकसुरी तेच ते प्रेझेंटेशननंतरचं भाषण, संगीता बिजलानी सोबतचं प्रेमप्रकरण आणि नंतर मॅच फिक्सिंग. या सर्व बाबींमुळे तो सतत चर्चेत राहिला. या आठवड्यात त्याचा बायोपिक रिलीज होतोय. या सिनेमाच्या निमित्ताने जुन्या सामन्यांच्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळणार आहे. 

यू हेट हिम ऑर लव्ह हिम, पण खरा क्रिकेटरसिक  हा सिनेमा पाहील यात शंकाच नाही..

टॅग्स:

cricket

संबंधित लेख