कथा आहे गिरीश कुलकर्णी यांची. त्याला सिनेमात रुपांतरीत केलंय निपुणने. आपण ट्रेलर मध्ये पाहू शकतोच की चित्रपटाचा विषय काहीसा वादग्रस्त आहे. मुलांना गणेशोत्सवात एक नाटुकली सादर करायची आहे, पण त्याच्या आड ‘मोठ्यांचे’ विचार आडकाठी करतात. त्यातून मग ही मुलं कोणता मार्ग शोधून काढतात, त्यांना हे नाटक करता येतं का ? याची ही गोष्ट. मुलांच्या दृष्टीकोनातून ही फिल्म विषयाची एक वेगळी बाजू दाखवते. चित्रपटात येणारा एक संवाद चित्रपटाचा केंद्रबिंदू आहे असं म्हणायला हरकत नाही - “मुलांनी मुलांसाठी केलेलं पहिलं गुप्त नाटक.”
मंडळी, विषय वेगळा आहे, संवेदनशील आहे पण त्याला तेवढ्याच जबाबदारीने हाताळण्यात आलं आहे. २०१९ मधली ही एक महत्वाची फिल्म ठरू शकते.
तुम्हाला ‘धप्पाचा’ ट्रेलर कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा.