पुलं बाळासाहेब ठाकरेंचे शिक्षक होते की नाही? वाचा खरं काय ते !!

लिस्टिकल
पुलं बाळासाहेब ठाकरेंचे शिक्षक होते की नाही? वाचा खरं काय ते !!

मंडळी, ४ जानेवारी रोजी ‘भाई-व्यक्ती की वल्ली’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. काहींना चित्रपट प्रचंड आवडला, तर काहींना चित्रपटातल्या अनेक गोष्टी खटकल्या. बाळासाहेब ठाकरे हे पुलंच्या पत्नी सुनिताबाई यांचे विद्यार्थी होते ही गोष्टही खटकणाऱ्या गोष्टींपैकीच एक होती.

चित्रपटात सुनिता बाई या बाळासाहेबांच्या शिक्षिका होत्या असं सांगण्यात आलं आहे. ही गोष्ट अनेकांना पटली नाही. सुनिताबाई आणि बाळासाहेब हे दोघेही एकाच वयाचे. दोघांचाही जन्म १९२६ सालातला. मग सुनिता बाई बाळासाहेबांना कशा काय शिकवायच्या ? असा प्रश्न पडणे साहजिक आहे. याबद्दल पूर्वीही कधी ऐकिवात आलेलं नाही.

या गोष्टीबद्दल आम्ही शोध घेतल्यावर आमच्या हाती एक पुरावा लागला आहे. चित्रपट बरोबर आहे की चूक याचं उत्तर खुद्द सुनिता बाई देशपांडे यांनीच देऊन ठेवलंय.

मंडळी, सुनिताबाईंच्या “मनातलं अवकाश” या पुस्तकातला हा परिच्छेद आहे. सुनीताबाईंनी स्पष्ट म्हटलंय की बाळासाहेब ठाकरे हे ‘भाई’ म्हणजे पुलंचे विद्यार्थी होते, तर राज ठाकरे यांचे वडील श्रीकांत ठाकरे हे त्यांचे म्हणजे सुनीताबाईंचे विद्यार्थी होते.

चित्रपटातल्या एका प्रसंगात बाळासाहेबांना सुनीताबाई वर्गाबाहेर काढतात तो सीन तिथे कसा आला याचं उत्तर या परिच्छेदात सापडू शकतं. नाही म्हणायला पटकथा लिहिताना थोडी “क्रियेटिव्ह लिबर्टी” घेण्यात आली आहे. त्यामुळेच हा सीन न पाटण्यासारखा झाला असावा. शेवटी चित्रपट चित्रपट असतो राव.

पुस्तकाविषयी थोडक्यात :

पुस्तकाविषयी थोडक्यात :

“मनातलं अवकाश” या पुस्तकात १६ वेगवेगळे लेख आहेत. पहिलाच लेख आहे “आठ आण्यांतलं लग्न”. या लेखात सुनिता बाई आपल्या लग्नाचा किस्सा सांगतात. त्याकाळी अवघ्या आठ आण्यात मिळणाऱ्या लग्नाच्या रजिस्टर फॉर्मवर अगदी काही मिनिटात त्यांचं लग्न उरकण्यात आलं होतं. (हा प्रसंग चित्रपटातही आहे) या किश्श्याची सुरुवात त्यांनी ‘ओरियंट हायस्कूल’ मधल्या त्यांच्या आणि पुलंच्या भेटीपासून केली आहे. ही सुरुवात तुम्ही वरील परिच्छेदात वाचू शकता.

तर मंडळी, चित्रपट म्हटला की त्यात कल्पनेच्या भराऱ्या आल्याच. पण जेव्हा खऱ्याखुऱ्या व्यक्तीचं चरित्र सांगताना कल्पनेची भेसळ केली जाते तेव्हा त्या गोष्टी नक्कीच न पटण्यासारख्या वाटू शकतात.

टॅग्स:

marathiBobhatabobhata marathibobhata newsmarathi newsbobatamarathi infotainment

संबंधित लेख