चित्रपट लेखक-दिग्दर्शक नागराज मंजुळेंच्या सैराटची मोहिनी अजूनही लोकांच्या मनातून उतरायचं नाव घेत नाहीये. तिकीटबारीवर उत्पन्नाचे विक्रम करणा-या सैराट चित्रपटाच्या संगीताने, सिनेमॅटोग्राफीने भल्या भल्यांना भुरळ घातली आहे. त्यांच्यापैकीच एक आहेत बेळगावचे जाधव बंधू.
साॅफ्टवेअर तज्ज्ञ प्रशांत आणि आर्किटेक्ट गुरूनाथ जाधव या दोघा बेळगावकरांनी सैराटमधल्या, ‘सैराट झालं जी’, गाण्याचा विडीओ, अगदी नागराज स्टाईलमध्ये पुनर्चित्रित करून सैराट चित्रपटाला आपली मानवंदना दिली आहे.

आपल्याच मित्रमंडळातील दोस्तांवर चित्रित झालेला हा विडीओ सध्या यूट्यूबवर व्हायरल झाला आहे. बेळगावातच विविध ठिकाणी चित्रिकरण करून तयार केलेला हा विडीओ स्थानिक पातळीवर इतका प्रसिद्ध झाला की वेळगावातील ग्लोब चित्रपटगृहात प्रत्येक खेळापूर्वी तो दाखवला जात आहे.




