सकाळपासून सोशल मिडियावर आणि झाडून सार्या न्यूज चॅनल्सवर तन्मय भट हे नांव गाजतं आहे. त्याच्याविरूद्ध पोलिसांतही तक्रार झालीय आणि फक्त मराठीच नाही , तर सारे भारतीय त्याच्यावर टीका करत आहेत.
काय केले तन्मयने?
तन्मय भटने एक व्हिडिओ बनवलाय. त्यात तो लतादीदी आणि सचिनसारखे आवाज काढून बोलतोय. अर्थात आवाजाची नक्कल त्याला जमलेली नाहीच. सचिनच्या आवाजात बोलताना तो विनोद कांबळीने "विराट सचिनपेक्षा चांगला खेळाडू आहे" असं म्हटल्याचं सांगतोय. आणि त्यावर प्रतिक्रिया म्हणून अत्यंत घाणेरड्या आवाजात सचिन "ए कुत्र्या.." म्हणून ओरडतो असंही दाखवलं आहे.
लतादीदींना कांबळीचं मत पटतं असं जेव्हा त्या म्हणतात, तेव्हा सचिन त्यांना ५०००वर्षे वयाची म्हातारी म्हणतो आणि त्यांच्या दिसण्यावरून अनादराने काही विधाने करतो. हे दोन्हीही सेलिब्रिटी त्यांच्या कार्याने आणि सोशल मिडियातल्या वावरावरून अत्यंत माननीय व अदबशीर आहेत. त्यामुळॆ त्यांच्या तोंडी अशी वक्तव्ये घालणे हे हीन अभिरुचीचे लक्षण आहे.
कोण आहे हा तन्मय भट?
"AIB" म्हणजेच "ऑल इंडिया बकचोद" या ग्रुपचा सभासद असलेला तन्मय एक स्टॅंड-अप म्हणजेच उभ्या उभ्या विनोद करणारा कॉमेडियन आहे. यापूर्वीही ’ AIB Roast' प्रकरणामुळे सारेच ’AIB' सभासद गोत्यात आले होते.
मुंबई सायबर सेलने फेसबुक, गुगल आणि ट्विटर या कपन्यांना हा व्हिडिओवर बंदी घालण्यासाठी संपर्क केला आहे. एक कॉमेडियन म्हणून तन्मयला अभिव्यक्ती स्वातंत्र्य असलं तरी अशा प्रकारचा विनोद नक्कीच चांगला नाही. सोशल मिडियावर त्याच्या चाहत्यांनीही तन्मयवर टीक करून निषेध व्यक्त केला आहे.




