"साधा आजार, पण करी बेजार...'' हे वर्णन सर्दीला तंतोतंत लागू होतं. सर्दी मुख्यत: दोन प्रकारची असते- अॅलर्जिक सर्दी आणि जंतुसंसर्गाने होणारी (इन्फेक्टिव्ह) सर्दी. अॅलर्जिक सर्दीतही दोन प्रकार आहेत. काही जणांना वर्षभर सर्दी असते, तर काहींना फक्त काही ऋतूंमध्ये- प्रामुख्याने पावसाळ्यात आणि हिवाळ्यात सर्दीचा त्रास होतो.
सर्दी हे एक प्रकारचं इन्फेक्शन आहे. आपलं नाक हे शरीर आणि आजूबाजूचं वातावरण यांच्यामध्ये असलेलं एक प्रवेशद्वार आहे. वातावरणातील विविध घटकांना शरीरात प्रवेश करू देणं किंवा नाकारणं हे या प्रवेशद्वाराच्या हातात असतं. जेव्हा बाहेरच्या हवेतून एखादा विषाणू, अॅलर्जी निर्माण करणारा घटक, धूळ, रसायन किंवा अन्य प्रदूषणकारी घटक आपल्या नाकात शिरतो, त्यावेळी नाकाच्या आतील त्वचेचा दाह होतो आणि तिथे असलेला श्लेष्म म्हणजेच म्यूकस नाकातून वाहायला लागतो. ही शरीराची बाहेरील घटकाविरुद्ध लढण्यासाठीची नैसर्गिक यंत्रणा असते. श्लेष्माबरोबर नको असलेले घटक शरीराबाहेर टाकले जातात. नाकात जे काही गेले आहे त्याला मिळणारा हा सर्वसाधारण प्रतिसाद असतो. हा प्रतिसाद वाढीव स्वरूपात दिसू लागला तर त्याचं रुपांतर सर्दीत होतं.
याचं कारण कधीकधी ही यंत्रणा काम करेनाशी होते आणि या बाह्य घटकांचं शरीरावर आक्रमण होतं. गळणाऱ्या नाकाव्यतिरिक्त, घशात खवखव, खोकला, सततच्या शिंका, नाकी चोंदणं ही लक्षणं दिसू लागतात. सर्वसाधारणपणे प्रौढ माणसांना वर्षातून दोन ते तीन वेळा सर्दी होते आणि एका वेळी झालेली सर्दी साधारण सात ते दहा दिवस टिकते. पण काही जणांना सतत सर्दी होत राहते. म्हणजे दर पंधरा दिवसांनी किंवा महिनाभराने सर्दीचा त्रास होतो. अनेकदा जोडीला ताप, डोकेदुखी हीही लक्षणं असतात. यामुळे दैनंदिन कामांमध्ये बाधा तर येतेच, याशिवाय एकंदरीत निरुत्साही आणि अस्वस्थ वाटत राहतं. या सतत होणाऱ्या सर्दीमागची कारणं अनेक आहेत. तुम्हीही यापैकी एक असाल तर ही कारणं पडताळून बघा.










