जग सात खंड आणि ५ महासागरांनी तयार झालं आहे हे आपण शाळेत शिकलोच आहोत. यापुढे कदाचित हा अभ्यासक्रम राहणार नाही. याचं कारण असं की नवीन पिढीला आठ खंड आणि ६ महासागरांचा इतिहास आणि भूगोल शिकवला जाईल. हे आम्ही कशाच्या जोरावर बोलत आहोत? अहो जमिनीखाली बऱ्याच घडामोडी घडत आहेत आणि जगाचा नकाशा बदलत आहे.
पण.. पण काळजीचं कारण नाही. कारण बदल घडून पृथ्वीचा चेहरा बदलायला लाखो वर्षं आहेत. अचूक सांगायचं झालं तर १० लाख वर्ष.
जग हे फार मंद गतीने विकसित झालं आहे. जगात होणारा हा नवीन बदलही असाच मंद गतीने होणार आहे. त्याची सुरुवात मात्र आतापासूनच दिसू लागली आहे. गेल्यावर्षी आफ्रिकेतली एक भलीमोठी भेग चर्चेत होती. केनिया देशात जमिनीचे दोन तुकडे पडले होते. आफ्रिका खंड विभागला जातोय अशा बातम्या येत होत्या. तुम्हीसुद्धा व्हायरल झालेले फोटो पाहिले असतीलच. आजच्या लेखाचा विषय याच गोष्टीशी निगडीत आहे.





