मिठी मारणे, आलिंगन देणे, गळाभेट घेणे, उराउरी भेटणे.. या सगळ्या एकाच शारिरीक क्रियेच्या अनेक छटा आहेत. पण त्या छटांचा अर्थ प्रसंगानुरुप, वेळोवेळी, नात्यागणिक बदलत असतो. कवळणे, कवटाळणे किंवा कवेत घेणे हे मराठी शब्द मिठीला, मिठीपेक्षा जास्त जवळचे आहेत. माय लेकराला कवेत घेते. वारकरी एकमेकांना उराउरी भेटतात, सीमेवरचा जवान मरणाला मिठी मारतो, प्रियकर प्रेयसीला आलिंगन देतो किंवा बाहुपाशात घेतो.. या त्या वेगवेगळ्या छटा आहेत. मग सध्या आपण नव्या पिढीतील सर्वांना भेटल्यानंतर मिठी मारताना बघतो ती मिठी समजायची, की कवळ, की आलिंगन, की गळाभेट ?? नक्की समजायचं तरी काय ?
मग नेमकं हे काय हे आज आपण समजून घेऊ या !!

सर्वप्रथम हे समजून घेऊ या की हा एक नविन सामाजिक रिवाज (सोशल प्रोटोकॉल )आहे. एकमेकांना स्पर्श करून स्वागत करण्याची, जवळीक साधण्याची सामाजिक प्रथा आपल्याकडे कधीच नव्हती. अगदी दहा वर्षांपूर्वी पण ही मोकळीक आपल्या समाजात नव्हती. शेकहँड करणं इतकाच सोशल प्रोटोकॉल तेव्हापर्यंत होता. आजही स्त्री भेटल्यावर हातमिळवणी करण्यापेक्षा नमस्कार करणं किंवा नमस्ते करणं हे जास्त शिष्टसंमत समजलं जातं. मग प्रश्न असा आहे की हा नविन प्रकार आला कुठून ??
केविन झाबोर्नी (स्रोत)
हा अमेरीकेतून आलेला नविन सामाजिक शिष्टाचार आहे. इंग्रजीत याला हग किंवा हगींग असं म्हणतात. (हे मराठीत म्हणताना फारच विचित्र वाटतं नाही का?) तर हे हगींगचं खूळ बोकाळलं एका अमेरीकन माणसामुळं. त्याचं नाव आहे केविन झाबोर्नी. केविनच्या मते अमेरीकन लोक प्रेम किंवा जिव्हाळा व्यक्त करताना फारच कंजूसी करतात. म्हणून २१ जानेवारी हा दिवस हगींग डे म्हणून साजरा करायचा प्रस्ताव त्यानी लोकांसमोर मांडला आणि तेव्हापासून म्हणजे १९८६ पासून अमेरीकेत २१ जानेवारी "नॅशनल हगींग डे" साजरा केला जातो. हळू हळू ही हगींगची प्रथा पसरत गेली आणि आता नव्या पिढीची प्रातिनिधीक प्रथा झाली आहे. हे झालं अमेरीकेचं. त्यानंतर हाच हगींग डे वॅलेंटाइन डे च्या आठवड्यात म्हणजे वॅलेंटाइन डे चा सातवा दिवस हगींग डे म्हणून साजरा व्हायला लागला!! या हगींग डेला रोमँटीक झालर आहे. पण २१ जानेवारीचा हगींग डे शुध्द मैत्रीचा दिवस आहे.
आता हगींग हा सामाजिक शिष्टाचाराचा भाग झालाच आहे तर हे हगींग नक्की कशा पध्दतीने करावं याचे काही सामाजिक संकेत पण आहेत.




