गेले काही महिने वैद्यकीय जगताची परिस्थिती 'रात्रंदिन आम्हा युध्दाचा प्रसंग' अशी आहे. कोवीड जगभर वेगाने पसरतो आहे. त्यावर खात्रीलायक औषध अजूनही आपल्या हातात नाही. सोशल डिस्टन्सींग उपयुक्त असले तरी त्यामुळे अनेक देश आर्थिक गर्तेत ढकलले जात आहेत. आता परिस्थिती नाजूक आणि अगतिकतेची झाली आहे. एखाद्या औषधाच्या इलाजाने रोगी बरा होण्याची अंधूक शक्यता दिसली तरी ते औषध वापरले जाते आहे. सध्या इबोला या विषाणूवर गिलीयाड या कंपनीने शोधलेले रेमडेसीवीर हे औषध अमेरिकेत वापरण्यात येणार आहे.
कोवीडला टक्कर देणारे व्हॅक्सिन अजूनही जन्माला आलेले नाही. ते इतक्या घाईघाईत बनेल अशी शक्यताही दिसत नाही. शास्त्रज्ञांच्या मते इतक्या कमी वेळात व्हॅक्सिन बनवणे म्हणजे १०० वर्षाचं काम १० सेकंदात होईल अशी आशा बाळगण्यासारखं आहे. व्हॅक्सिन बनवणं अनेक वर्षांचं काम असतं. त्यात खात्रीचा मार्ग मिळण्याआधी अनेक प्रयत्न अपयशी ठरू शकतात. तरीपण अनेक कंपन्या शक्य तितक्या लवकर हे व्हॅक्सिन बनवण्याचा प्रयत्न करत आहेत.








