करोनाच्या दुसर्या लाटेने आता उग्र रुप धारण केले आहे. बातम्यांच्या वेगवेगळ्या चॅनेलवरून दर तासाला आकड्यांचा होणारा भडीमार आता सहन होत नाही अशी सर्वसामान्य माणसाची मानसिक अवस्था आहे. अशा परिस्थितीत वेगवेगळ्या समाज माध्यमातून परस्पर विरोधी मतं मांडली जात आहे. पण यातील बरीचशी मते Non -qualified / Unqualified असतात. त्यामुळे 'बोभाटा' ने प्रत्यक्ष कोव्हीडच्या रणभूमीवर लढणार्या डॉ. प्रकाश कोयाडे यांचा लेख वाचला तेव्हा तो आमच्या वाचकांपर्यंत पोहचला पाहिजे असे वाटल्याने त्यांनी व्यक्त केलेले विचार आणि सत्य परिस्थिती आम्ही तुमच्यासमोर मांडत आहोत.
सध्या डॉक्टर प्रकाश कोयाडे यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटल, पुणे येथे कार्यरत आहेत. रोज शेकडो फोन त्यांना येत असतात आणि मागणी एकच असते 'डॉक्टर बेड मिळवून द्या' या फोन करणार्या अनेक गरजू लोकांना त्यांचे एकच सांगणे आहे. ते कोव्हीडच्या रणभूमीवर लढणार्या अनेक डॉक्टरांपैकी एक आहेत. ते लेखक असल्यामुळे सध्याच्या दुसर्या लाटेबद्दल ते अधिक चांगल्या रितीने व्यक्त होऊ शकत आहेत. अशा संदिग्धावस्थेत असलेल्या लोकांना त्यांनी केलेले मार्गदर्शन असे आहे.










