सर्वसामान्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी 'आयुष्मान भारत' योजना आहे तरी काय ? वाचा हे ४ मुद्दे !!

सर्वसामान्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी 'आयुष्मान भारत' योजना आहे तरी काय ? वाचा हे ४ मुद्दे !!

मंडळी, "आयुष्मान भारत" नावाची नवी योजना २५ सप्टेंबर रोजी पदार्पण करत आहे. तुम्हांला माहित आहे नक्की काय आहे ही योजना? नाही ना? म्हणूनच आम्ही खास बोभाटाच्या वाचकांसाठी घेऊन आलोय  योजनेची माहिती आणि  वैशिष्ट्ये...

लोकहो, या योजनेद्वारे ५० कोटी भारतीयांना ५ लाखाच्या आरोग्य विम्याचं संरक्षण मोफत मिळणार आहे. हो, पण हे संरक्षण मोफत मिळणार आहे हे महत्वाचं नाही तर,  या देशातल्या अनेक गरीब आणि दारिद्र्य रेषेखाली राहणार्‍या जनतेचा जगण्यावर विश्वास वाढेल हे फारच महत्वाचं आहे.  आणि यासोबतच आणखी महत्वाची असेल या योजनेची व्याप्ती आणि त्यातून मिळणाऱ्या अरोग्य सेवेचा दर्जा !!

आता अशा वेळेला येते ती शंका आताही तुमच्या मनात असेलच. 'मोफत' वाल्यांना आणि 'पेड' वाल्यांना मिळणार्‍या सोयी वेगवेगळ्या असतील की सारख्याच?  तर, याबाबतीत एक मुद्दा सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आलाय. ते म्हणतात की या योजनेत असा कोणताही भेद नसेल. इतकंच नव्हे तर इतर मेडीक्लेम (आरोग्य विमा योजना ) जे फायदे देत नाहीत, ते फायदेसुद्धा या योजनेअंतर्गत मिळणार आहेत. उदाहरणार्थ समजा, एखाद्याला सध्या मधुमेह आहे, तर मेडीक्लेममध्ये त्या आजाराचे संरक्षण मिळणार नाही. जन्मजात व्यंग अथवा त्रुटी असेल तर विमा संरक्षण मिळणार नाही. मानसिक आजारांना  मेडीक्लेम  संरक्षण देत नाही. पण  "आयुष्मान भारत" या योजनेत सर्वांना सारखंच संरक्षण मिळणार आहे.

या आयुष्मान भारत योजनेत आणखीही काही खास सुविधा आहेत बरं...

१. कुटुंबात किती व्यक्तिंना या योजनेमधून हे संरक्षण मिळेल यावर काही मर्यादा नाही. कितीही मोठे कुटुंब असले तरी सर्वांना संरक्षण मिळेल. 
२. नोंदणीकरण्यासाठी फॉर्म भरणे आवश्यक नाही. आधार कार्डचा नंबर पुरेसा आहे.
३. आरोग्य सेवा देणार्‍या हॉस्पीटलचे जाळे पुरेसे मोठे असेल .
४. नियोजित शस्त्रक्रीया असेल, तर आगाऊ परवानगी घेणे आवश्यक आहे . परवानगी १२ तासात नाही आली,  तर परवानगी मिळाली असे गृहीत धरण्याची सुविधा आहे.

काय मंडळी, वाटतंय ना अच्छे दिन आले म्हणून? काही असो, सर्वसामान्यांच्या आरोग्याची काळजी करणारी एक चांगली योजना येऊ घातलीय. तिचा वेळ पडल्यास उपयोग करुन घ्या. कुणावर अशी वेळ येऊ नये ही सदिच्च्छा तर आहेच.

टॅग्स:

marathi newsBobhatabobhata marathimarathi infotainmentbobhata infotainmentbobhata newsbobata

संबंधित लेख