टायटॅनिक जहाजाला जलसमाधी मिळून आज १५ एप्रिलला १०८ वर्ष पूर्ण होतील. टायटॅनिकबद्दल अनेक किस्से सांगितले जातात. त्यावर एक अप्रतिम सिनेमासुद्धा तयार झाला. टायटॅनिक हा विषयच असा आहे की त्यातून पुढेही अनेक गोष्टी बाहेर पडत राहतील. आज आम्ही अशाच काही गंमतीदार गोष्टी घेऊन आलो आहोत.
टायटॅनिकचं नाव निघालं आणि चित्रपटात दाखवलेला निळ्या रंगातील ‘हार्ट ऑफ ओशन” या हिऱ्याबद्दल बोललो नाही, असं होईल का? आधी ‘हार्ट ऑफ ओशन” बद्दल जाणून घेऊया.
टायटॅनिक सिनेमात हिरोईनच्या गळ्यात एक निळ्या रंगाचा हिरा दाखवलेला तुम्ही पहिला असेल. या हिऱ्याला “हार्ट ऑफ ओशन” म्हणतात. मंडळी, खऱ्या टायटॅनिक जहाजावर देखील हा हिरा होता. पण त्याची गोष्ट आणि सिनेमातील हिऱ्याची गोष्ट थोडी वेगळी आहे.
सिनेमात हा हिरा ‘रोझ’ म्हणजे आपल्या हिरोईनला तिचा होणारा नवरा भेट म्हणून देतो. पण खऱ्या आयुष्यात हा हिरा एका मालकाने आपल्या नोकराणीला दिला होता. ही नोकराणी त्याची भावी पत्नी होणार होती. त्या व्यक्तीचं नाव होतं ‘हेन्री मोर्ले’. हेन्री हा टायटॅनिकवरून त्याची असिस्टंट केट फिलीप हिच्या बरोबर प्रवास करत होता. हा प्रवास खरं तर लपून-छपून चालला होता. दोघांनाही अमेरिकेत जाऊन नवीन आयुष्याची सुरुवात करायची होती. पण त्यांचं हे स्वप्न पूर्ण झालं नाही. हेन्री बुडून मरण पावला, तर केट जिवंत वाचली. ती सुखरूप वाचल्यानंतर तिच्याकडे हा हिरा होता. आज आपण ज्याला 'हार्ट ऑफ ओशन' म्हणतो तसा हा हिरा नव्हता. त्याचं नाव होतं “दि लव्ह ऑफ दि सी’!!
ही झाली आपल्या 'हार्ट ऑफ ओशन'ची खरी गोष्ट! पण अशा अनेक मौल्यवान गोष्टी टायटॅनिकबरोबर समुद्राच्या पोटात निघून गेल्या. त्यातील काही गोष्टी पुन्हा मिळवण्यात यश आलं, तर काही ह्या आजवर मिळू शकलेल्या नाहीत. चला पाहूयात टायटॅनिकसोबत जलसमाधी मिळालेल्या १० मौल्यवान गोष्टी कोणत्या होत्या ते...














