शहरातल्या रिकाम्या आणि एकाच एक रंगातल्या भिंतींना जिवंतपणा येतो तो ग्राफिटीने. मुंबई, पुणे, ठाण्यातल्या भिंती अशा असंख्य ग्राफिटीजने भरलेल्या आढळतात. गेल्यावर्षी चर्चगेट स्टेशनवर गांधीजींचं भलंमोठं चित्र रंगवण्यात आलेलं. याखेरीज मुंबईतल्या ससून डॉकचा कायापालट करून तिथल्या भिंती ग्राफिटींनी भरून गेल्या होत्या. तुम्ही जर पुण्यात फिरलात तर तिथल्या एका भिंतीवर मोठ्या अक्षरात 'निवांत' लिहिलेलं नक्की पाहिलं असणार.
मंडळी, आज आम्ही ग्राफिटी बद्दल यासाठी बोलत आहोत की ज्या ग्राफिटीला कलेच्या विश्वात थोडं खालचं स्थान होतं तीच ग्राफिटी आता शहरांना नवं रूप देण्याचं काम करत आहे. संपूर्ण भारतभर अशा अफलातून ग्राफिटी पाहायला मिळतात. त्यातल्या काही निवडक आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. कोणती ग्राफिटी तुम्हाला तुमच्या शहरात पाहायला आवडेल ते सांगायला विसरू नका !
















